कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे आमदारांकडे साकडे

चाफळ – अतिवृष्टी काळात चाफळ विभागात शेतीचे शेकडो हेक्‍टर नुकसान झाल्याने शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बॅंका, सोसायट्यांकडून घेतलेली कर्जे फेडणेही अशक्‍य झाले आहे. यासाठी आ. शंभूराज देसाई यांनी शेतकऱ्यांची व्यथा शासन दरबारी मांडून शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, अशी मागणी जाळगेवाडीसह विभागातील 25 ते 30 वाड्यांवस्त्यांमधील शेतकऱ्यांमधून होत आहे.

याबाबतचे निवेदन जाळगेवाडीचे शेतकरी सुनील साळुंखे, गणपत साळुंखे, रवींद्र साळुंखे, दत्तात्रय शेळके यांचेसह शंभर शेतकऱ्यांनी आ. शंभूराज देसाई यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी बॅंका व विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतीसाठी लाखो रुपयांची कर्जे काढली आहेत. पिकाचे उत्पन्नातून सदरची कर्जे फेडण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन असते. मात्र यावेळी झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या घरांच्या पडझडीसह शेतांचेही मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतजमिनी खचल्याने अपरिमीत हानी झाली आहे.

यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बॅंका व विकास सोसायट्यांची काढलेली कर्जे फेडायची कशी? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सोसायट्यांनी कर्जाच्या रक्‍कमा भरण्यासाठी शेतकऱ्याच्या पाठीमागे तगादा लावला आहे. शासनाने जाहिर केलेल्या कर्जमाफी योजनेत परिपूर्ण अर्ज भरुनही बऱ्याच शेतकऱ्यांचा विचार झालेला नाही. यासाठी तालुक्‍याचे आमदार शंभूराज देसाई यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्ज माफी मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशीही मागणी विभागातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.