नवी दिल्ली – सप्टेंबर आखेरच्या तिमाहीत पुण्यात मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र बॅंकेच्या कर्ज पुरवठ्यात 11.46 टक्क्यांची वाढ झाली. या तिमाहीत बॅंकेने 1,15,236 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला.
कर्जपुरवठयामध्ये वाढ करण्यात महाराष्ट्र बॅंकेने इतर सरकारी बॅंकेच्या तुलनेत बाजी मारली आहे. पंजाब अँड सिंध बॅंकेच्या कर्ज पुरवठ्यात 9.53 टक्क्यांची वाढ झाली असून सप्टेंबरअखेर तिमाहीत या बॅंकेने 67,574 कोटी रुपयाचा कर्ज कर्जपुरवठा केला.
रिटेल, कृषी आणि लघु उद्योगाला एकत्रित केलेल्या कर्ज पुरवठ्यात महाराष्ट्र बॅंक अग्रेसर ठरली असून या क्षेत्राला करण्यात आलेल्या कर्जपुरवठयात 14.24 टक्क्यांची वाढ होऊन बॅंकेने 70,515 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला.
ठेवी स्वीकारण्यातही बॅंकेने आघाडी घेतली आहे. या तिमाहीत महाराष्ट्र बॅंकेकडील ठेवीत 14.47 टक्के वाढ झाली. करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमध्ये 22 टक्के वाढ झाल्याचे महाराष्ट्र बॅंकेच्या ताळेबंदावरून दिसून येते. महाराष्ट्र बॅंकेचा एकूण व्यवसाय 13.27 टक्क्यांनी वाढून 2.97 लाख कोटी रुपये इतका झाला आहे.
त्यामुळे दुसऱ्या तिमाहीत बॅंकेचा नफा दुपटीने वाढून 264 कोटी रुपये इतका झाला आहे. बॅंकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता कमी होऊन 5.56 टक्के इतकी झाली आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बॅंकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 8.81टक्के इतकी होती. तर निव्वळ अनुत्पादक मालमत्ता केवळ 1.73 टक्के इतकी नोंदली गेली आहे.