पुणे जिल्ह्यासाठी 60 हजार कोटींचा कर्ज आराखडा

6 हजार 500 कोटींची तरतूद पीक कर्जांसाठी

पुणे – पुणे जिल्ह्याचा 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचा 60 हजार 360 कोटींचा कर्ज आराखडा जाहीर करण्यात आला आहे. यातील 6 हजार 500 कोटींची तरतूद ही पीक कर्जांसाठी आहे.

बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या जिल्हा अग्रणी बॅंक व जिल्ह्यातील सर्व बॅंकांच्या पुढाकाराने पतपुरवठा आराखडा तयार केला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रभाकर गावडे यांच्या हस्ते आराखड्याचे प्रकाशन करण्यात आले. बॅंक ऑफ महाराष्ट्र परिमंडल पूर्व क्षेत्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक सुधीर कुलकर्णी, भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे एल.डी.ओ.बी.एम. कोरी, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नितीन शेळके, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आनंद बेडेकर आदी यावेळी उपस्थित होते.

हा कर्ज आराखडा 60 हजार 360 कोटी रुपयांचा असून गेल्या वर्षीपेक्षा त्यात 8 टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे. पायाभूत क्षेत्रासाठी 37 हजार 468 कोटी रुपयांची तरतूद केली असून ती एकूण कर्जपुरवठ्याच्या 62 टक्के आहे. कृषी कर्जासाठी 6 हजार 551 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्याचे प्रमाण प्राथमिकता कर्जापैकी 17 टक्के आहे. कृषी कर्जामध्ये प्रामुख्याने सेंद्रीय शेती, फुले व फळबाग लागवड, हरितगृह, कृषी निर्यात योजना, कृषी यांत्रीकीकरण, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान तसेच शेतीपुरक व दुय्यम योजनांचा समावेश आहे.

कर्ज आराखड्यात सुक्ष्म, लघु व मध्यम (एम.एस.एम.इ.) उद्योगांसाठी तब्बल 22 हजार 908 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. स्वयंरोजगार योजना, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज आणि छोट्या व्यवसायासाठी 8 हजार 9 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे. या पतपुरवठा आराखड्यामध्ये व्यापारी बॅंका, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक तसेच महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेसह 41 बॅंकांच्या 1 हजार 794 शाखांचा सहभाग आहे. जिल्ह्यातील सर्व बॅंकांनी दिनांक मार्च 31 मार्च 2019 अखेरीस प्राथमिकता क्षेत्रात 35 हजार 18 कोटींचे वाटप केले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत बॅंकाना दिलेले उद्दिष्ट, त्यांनी पूर्ण केले असल्याची माहिती बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

कृषी कर्जामध्ये
कृषी कर्जामध्ये प्रामुख्याने सेंद्रीय शेती, फुले व फळबाग लागवड, हरितगृह, कृषी निर्यात योजना, कृषी यांत्रीकीकरण, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान तसेच शेतीपुरक व दुय्यम योजनांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.