सोलापूर महामार्गावर इंटरसेफ्टर कारची सोय : दरररोज एक हजारांवर दंडाच्या कचाट्यात
पळसदेव- पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या वेगाला चाप लावण्यासाठी इंटरसेफ्टर कारची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांना वाहनावर दंडात्मक कारवाही करणे आता सुलभ झाले आहे. गेल्या महिनाभरापासून भिगवण ते इंदापूरदरम्यान वेगाने प्रवास करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याचे सत्र सुरु आहे. महिनाभरात एक हजार चारशे वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित अभंग यांनी दिली.
महामार्गावर या कारमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. या माध्यमातून वाहनाचा वेग काळ्या रंगाच्या काचा, अल्कहोल तपासणी, विनाहेल्मेट दुचाकीची नोंद करण्याची व त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची सुविधा आहे. ही यंत्रणा मुंबई येथील मुख्य नियतकाच्या सर्व्हरशी जोडण्यात आली आहे. दिवसभर साठवलेला डेटा या सर्व्हरला पाठवण्यात येतो. यामध्ये वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनाचा फोटो घेतला जातो. त्याचा वेग तपासणे व त्यांना ऑनलाइन मेसेज पाठवण्याचे काम केले जाते. शिवाय ऑनलाइन दंडाची रक्कम भरण्याची सुविधा देण्यात आल्याने वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर कारवाईचे अस्त्र मिळाले आहे.
प्रत्यक्ष इंटरसेफ्टर कारच्या माध्यमातून कारवाई करणारे सहायक फौजदार बबन जाधव व पोलीस कॉन्स्टेबल नाथा गळवे यांनी ही यंत्रणा हाताळणे सोयीस्कर असल्याचे सांगितले. चारचाकी वाहनांसाठी वेग मर्यादा ताशी 90 किलोमीटर अशी आहे. वेग मर्यादा ओलांडणाऱ्यावर कारवाई झाल्याने या महामार्गावरून जाणाऱ्या गाड्यांचा वेग आटोक्यात आणण्यास मदत होईल.सध्या वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनाला 1 हजार रुपये दंड आकारण्यात येतो. दररोज साठ ते सत्तर वाहनांवर ही कारवाई करण्यात येत आहे. दररोज साठ ते सत्तर हजार रुपयांचा महसूल गोळा होत असल्याचे अभिजित अभंग यांनी सांगितले. या इंटरसेफ्टर कारमुळे वेगावर मर्यादा येणार आहे. यादरम्यान होणारे अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होणार आहे.
- सोलापूर महामार्गावर इंटरसेफ्टर कारची सुविधा उपलब्ध केल्यामुळे महामार्ग पोलिसांवरील ताण कमी होणार आहे. महामार्गावर महिन्याकाठी दहा ते बारा छोटे- मोठे अपघात घडत असतात. त्यामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण पडत आहे. तसेच महामार्गालगतच्या गावातील पोलीस स्टेशन अथवा पोलीस चौकाअंतर्गत पोलिसांना हे सर्व कामे सोडून अपघाताचे सोपस्कार पार पडावे लागत आहे. परंतु इंटरसेफ्टर कारमुळे वाहनचालकांच्या वेगाला चाप लावण्याचे काम सुलभ झाले आहे.