सुरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी वनविभागाकडून उपाययोजना
प्रायोगिक तत्त्वावर एका ब्रीजची होणार उभारणी
पुणे – रस्ता ओलांडताना वन्यप्राण्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशा घटना रोखण्यासाठी, तसेच वन्यप्राण्यांना सुरक्षितरीत्या रस्ता ओलांडता यावा, यासाठी वनविभागाकडून महामार्गांवर “लिव्हिंग ब्रीज’ उभारण्याचा विचार केला जात आहे. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर एका ब्रीजची उभारणी केली जाणार असून, त्यासाठी योग्य जागेबाबत विभागाकडून सर्वेक्षण सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील विविध भागांमधून राष्ट्रीय, राज्य महामार्ग तसेच जिल्हा, तालुकांतर्गत रस्ते बांधले आहेत. यामध्ये नॅशनल हायवे क्रमांक 65, 48, 60 यासारख्या राष्ट्रीय महामार्गांचा, राज्य महामार्ग क्रमांक 27 (पुणे-अहमदनगर ) यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अंतर्गत रस्तेदेखील बांधले आहे. हे रस्ते अनेक ठिकाणी वनक्षेत्रामधून मार्गस्थ होत असतात.
साहजिकपणे याठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर मोठा असतो. परंतु, अनेकवेळा रस्ता ओलांडताना वाहनांची धडक बसून वन्यप्राणी जखमी झाल्याचे अथवा मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना याठिकाणी घडतात. यामध्ये बिबट, चिंकारा, तरस, कुत्री तसेच अन्य लहान-मोठे प्राणी-पक्षी यांचा समावेश आहे. या घटनांबाबत विविध प्राणीप्रेमी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात असंतोष व्यक्त करण्यात येतो. तसेच, या घटना रोखण्यासाठी वनविभागाने उपाययोजना कराव्यात, अशी विनंतीदेखील करण्यात येत होती.
या घटनांची दखल घेत, वनविभागाने वन्यप्राण्यांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा, यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये महामार्गालगत “लिव्हिंग ब्रीज’च्या उभारणीचा पर्याय समोर आला असून, त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर एका पुलाची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये दोन झाडांना दोरच्या सहाय्याने जोडत पूल उभारण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या संसाधनांमध्ये कोणतेही बदल न करता या पूलाची उभारणी केली जाणार असल्याने हा पर्याय उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी यांनी व्यक्त केली आहे.