पोलीस, ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे गायी पकडण्यात यश
देऊळगाव राजे, (वार्ताहर) – कत्तलीसाठी जाणाऱ्या पाच गावरान गायी पोलीस आणि ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे शिरापूर (ता. दौंड) येथे पकडण्यात आल्या.
दौंडकडून राशीनच्या दिशेने छोटा हत्तीमधून (एमएच 14 इएम 2644) पाच गाई नेल्या जात होत्या. हा टेम्पो शिरापूर हद्दीत बंद पडला असता चालकाने उपस्थितांना टेम्पो ढकलण्याची विनंती केली. गाडी ढकलत असताना बंद गाडीतून जनावरांच्या ओरडण्याचा आवाज आला असता उपस्थितांनी दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यानंतर चालकाने गाडी तशीच सोडून पळ काढला.
यावेळी ग्रामस्थांनी दरवाजा उघडला असता बळजबरीने पाच गावरान गाई कोंबून भरल्या असल्याचे निदर्शनास आले. यानंतर या गायींच्या मागावर असलेले सहाय्यक पोलीस हवालदार श्रीरंग शिंदे, पोलीस नाईक रमेश काळे, थोरात यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या गायी व वाहन ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेल्या गाई दौंड येथील लाडली गोशाळेत सोडण्यात आल्या असून, दोषींवर गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलीस नाईक रमेश काळे यांनी सांगितले.