मुख्यसभेसाठी 162 नगरसेवक स्वीकारणार धोका
गर्दी आवरण्याचे प्रशासनापुढे आव्हान : प्रतिबंधित क्षेत्रातील नगरसेवक मुख्यसभेला उपस्थित राहणार
पुणे – महापालिकेचे 162 नगरसेवक करोनाचा धोका पत्करणार आहेत. जूनच्या मुख्यसभेसाठी हे सर्व बुधवारी पालिकेत उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, शहरात संचारबंदी आणि 5 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई आदेश असतानाही महापालिकेची ही मुख्यसभा नियम धाब्यावर बसवून होणार आहे. त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेनेच कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केलेल्या भागातील काही नगरसेवकही या सभेला उपस्थित राहणार आहेत. तर, ज्या सभागृहात ही सभा होणार आहे ते संपूर्ण सेंट्रल एसी असल्याने उपस्थित नगरसेवक, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे.
कंटेन्मेंट झोनचे नगरसेवक उपस्थित राहणार
ज्या 92 नगरसेवकांसाठी ही सभा घ्यावी लागणार आहे. त्यात तसेच उर्वरीत नगरसेवकांमधील काही नगरसेवक कंटेन्मेंट झोनमध्ये राहात आहेत. तर काहींचे नातेवाईक करोनाबाधित आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे असे नगरसेवक बुधवारी उपस्थित राहणार असल्याने तसेच सभागृहातील गर्दी लक्षात घेता एसी लावणे क्रमप्राप्त असल्याने वयस्कर तसेच इतर आजार असलेल्या नगरसेवकांना करोना संसर्गाचा धोका पत्कारावा लागणार आहे.
महापालिकेसमोर कायदेशीर पेच
महापालिका अधिनियमानुसार, जे नगरसेवक सलग तीन मुख्यसभांना उपस्थित राहणार नाहीत. त्यांचे नगरसेवकपद रद्द होते. या पूर्वीची मुख्यसभा मार्च महिन्यात झाली. त्यानंतर एप्रिल आणि मेच्या सभांना गर्दीचे बंधन असल्याने काही मोजकेच नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात सुमारे 92 नगरसेवक गैरहजर असून त्यांना जूनच्या मुख्यसभेला उपस्थित राहाणे बंधनकारक आहे. नाही तर त्यांना नगरसेवकपद सोडावे लागणार आहे. परिणामी, जीव धोक्यात घालून त्यांना मुख्यसभेला उपस्थित रहावे लागणार आहे. तर प्रशासनालाही जमाबंदीचा आदेश मोडावा लागणार आहे.
एका सीटवर एकच जण
प्रशासनानेही नगरसेवकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या आहेत. सभागृत सदस्यांना बसण्यासाठी सोफ्याची सुविधा असून प्रत्येकी 2 ते 3 जागा असलेले हे सोफे आहेत. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक सोफ्यावर एकच सदस्य बसेल, अशी सुविधा केली आहे. तसेच, सकाळी सभेपूर्वी सभागृहात औषध फवारणी केली जाणार आहे. प्रवेशद्वारावर तसेच आतही जागोजागी सॅनिटायझर ठेवले जाणार असल्याचे नगरसचिव विभागाने स्पष्ट केले. तसेच, या सभेला सर्वसामान्य नागरिकांना मनाई आहे.