मन मारुन नव्हे तर मन भरून जगा

आयुष्य जगत असताना ते आपल्या मर्जीप्रमाणे आणि स्वच्छंदी जगावं अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. आयुष्यातील प्रत्येक आनंददायी क्षणाचा उपभोग आपल्याला घ्यायचा असतो. आपले मन त्यासाठी आपल्याला सतत सूचना देत असते. मानवी मन मोठे विलक्षण आहे. त्याचा ठाव घेणे सोपे नाही. बहिणाबाई यांनी तर आपल्या कवितेतून या मनाबाबत देवालाच प्रश्‍न केला आहे…

देवा, कसं देलं मन, आसं नहीं दुनियांत
आसा कसा रे यवगी, काय तुझी करामत।।

बहिणाबाई देवाला विचारत आहेत, हे असे कसे मन दिले जे विश्‍वात सापडणार नाही. तुझी करणी अगाध आहे. तू जादूगार आहेस, तुझी ही करामत आश्‍चर्याचा गोड धक्‍काच देणारी आहे. अशा या अद्वितीय आपल्या मनाचाही आवाज असतो ज्याला आपण “आतला आवाज’ म्हणतो. हा आतला आवाज आपल्याला जगण्यासाठी दिशादर्शक ठरत असतो. हा आवाज जरी ध्वनिरूपाने आपल्या कानावर पडत नसला तरी आपल्याला तो जाणीव करून देत असतो. या आवाजाची संवेदना थेट आपल्या मेंदूला होत असते आणि यातूनच आपण म्हणतो की “माझं मन मला सांगतंय’, माझा आतला आवाज म्हणतोय’ वगैरे…

परंतु आपल्या अंतर्मनाचा हा आवाज आपण खरंच ऐकतो का? आपण ऐकतो कधी कधी. या कधी कधी शब्दातच संपूर्ण अर्थ दडला आहे. मनाच्या स्वच्छंदी आवाजाला स्वैर न सोडता त्याला परिस्थिती आणि मनःस्थितीच्या पिंजऱ्यात आपण कैद करून ठेवतो. मनाचे ऐकले तर लोक काय म्हणतील? मनाच्या इच्छेनुसार करायला गेलो तर आपला तोटा तर नाही ना? मनाचे ऐकणे आपल्या प्रतिष्ठेला साजेसे नाही. अशा एक ना अनेक कारणांचा आधार घेत आपण मनभावनेला डांबून ठेवत असतो; परंतु याने काहीही सिद्ध होत नाही. उलट कालांतराने पश्‍चाताप होण्याचीही संभावना असते.

दैनंदिन जीवनात कितीतरी गोष्टी आपल्या मनात येतात, आलेल्या असता. मात्र, त्याच्या पूर्णतेच्या दृष्टीने आपण कधीही विचार करीत नाही.
रोजचे तेच ते काम करून जीवन कंटाळवाणे झालेले असते. मनाला आल्हादायक व निवांतपणा मिळावा यासाठी कुठेतरी फिरायला जाण्याची इच्छा असते. मात्र, काम, पैसा व जबाबदाऱ्या आपल्याला रोखून ठेवतात आणि मनाचे न ऐकल्याने एखाद्या रोबोप्रमाणे मॅन्युअल जीवन जगावे लागते. रस्त्यावरून जाताना कांदाभजीचा खमंग सुवास दरवळत असतो, तोंडाला पाणी सुटते; परंतु खर्च होईल, बाहेरचे खाल्ल्याने त्रास होईल या भावना जिभेची तृप्ती पूर्ण करीत नाहीत. परिणामी दरवळणारा वास घेण्यातच समाधान मानावे लागते.

मुलांना बागेत खेळायला नेल्यावर आपण बाजूला जाऊन बसतो. मुले मनसोक्‍तपणे खेळत असतात. तेवढ्यात ते आपल्याला हाक मारतात, “बाबा, तुम्ही पण या ना खेळायला.’ मनात इच्छा निर्माण होते; परंतु आपली प्रतिष्ठा आड येते. लोक काय म्हणतील, हा विचार करून आपण नकार देतो आणि मुलांसह आनंद लुटण्याचे सौख्य गमावून बसतो. एखाद्या कार्यक्रमात किंवा मित्राच्या लग्नाच्या वरातीत सर्व मित्र नाचत असतात. त्या संगीताच्या तालावर आपलेही पाय ठेका धरू लागतात. मित्र नाचण्यासाठी आपल्याला आग्रहसुद्धा करतात. सर्व जुळून आलेले असते परंतु “मला नाचता नाही येत’ हा एक नकारात्मक विचार आपल्याला थांबवतो आणि आपण आपल्या जीवनातील त्या अविस्मरणीय क्षणांना मुकतो.

पहिल्या पावसात मनसोक्‍तपणे भिजत बालपणाच्या रम्य आठवणींना उजाळा द्यायचा असतो. आपली मुलेही पावसात भिजण्याचा हट्ट करतात; परंतु सर्दी-पडसे होईल या विचाराने आपण ना स्वतः भिजतो ना मुलांना भिजू देतो. अति काळजीच्या ओलाव्यात त्या मुलांचे आयुष्य मात्र कोरडेच राहते. गाणे गावेसे वाटते, पण आपला आवाज योग्य नाही, सुरताल नाही म्हणून आपण अबोलपणा स्वीकारतो. मनाचा आवाज न ऐकल्याने गळ्यातून आवाज निघत नाही. परिणामी “जीवनगाणे’ हे केव्हा “रडगाणे’ होऊन जाते हे कळत नाही.

आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण मनमुरादपणे जगता आला पाहिजे. मन मारून जगण्यापेक्षा मनभरून किंबहुना भरभरून जगता आले पाहिजे. ज्या कृतीतून काहीतरी चांगलेच घडणार आहे, अशा कृतीसाठी मनाचे कवाड खुले ठेवले पाहिजे. मानसिक समाधानाला प्राधान्य देत प्रत्येक क्षणाला सणाचा साज देता आला पाहिजे. आयुष्य म्हटल्यावर दुःख, अपयश, चिंता आणि लोकमानस अशा गोष्टी तर आपल्या समोर येणारच; परंतु यावर मात करून अशा परिस्थितीतही मनात सकारात्मक भावनेची पेरणी आपल्याला करता आली पाहिजे.
“दिवस तुझे हे फुलायचे,
झोपाळ्यावाचून झुलायचे’

या ओळींना प्रमाण मानून आयुष्यातील प्रत्येक क्षणाला जगायला हवे.

सागर ननावरे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.