#IPL2020 : प्ले-ऑफसाठी कोलकाताला विजय आवश्‍यक

आज चेन्नईविरुद्ध रंगणार सामना

दुबई – अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतील आव्हान जरी संपले असले तरीही अन्य संघांचे क्रमवारीतील स्थान धोक्‍यात आणू शकत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला रोखत प्ले-ऑफमधील स्थान पक्‍के करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सला विजय आवश्‍यक बनला आहे. 

यंदाच्या स्पर्धेत कोलकाताने सुरुवातीच्या अपयशावर मात करत यशाच्या मार्गावर प्रवास सुरू केला. त्यांनी पहिल्या चार संघातही स्थान मिळवले होते. मात्र, अन्य संघांच्या विजय-पराजयांचे समीकरण त्यांनाही भोवले असून आज त्यांनी विजय मिळवला तर त्यांचे या गटातील स्थान निश्‍चित होणार आहे.

दीनेश कार्तिककडून नेतृत्व हाती घेत इयान मॉर्गनने पुढील दोन सामन्यांत चमक दाखवली असली तरीही त्यात सातत्याचा अभाव असल्याचेही दिसून आले आहे. चेन्नईने रॉयल चॅलेंजर बेंगळुरूला पराभूत केल्यामुळे आता कोलकाताला धक्‍का बसलेला आहे. जर या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला तर कोलकाताला प्ले-ऑफमधील स्थान मिळवणे कठीण बनणार आहे. 

या स्पर्धेत आता चेन्नईला गमावण्यासारखे काहीही शिल्लक नसल्याने ते अन्य संघांना धक्‍का देण्यासाठी सज्ज राहतील. कोलकाता संघ मधल्या फळीतील फलंदाजाचा तसेच मोक्‍याच्या क्षणी बळी घेऊ शकेल, अशा गोलंदाजाचा प्रश्‍न अद्याप सोडवू शकलेला नाही. हीच त्यांची यंदाच्या
स्पर्धेतील सर्वात कमकुवत बाजू आहे. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना सेकंड बेंचमधील अन्य पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.

कर्णधार मॉर्गन, नितीश राणा, सुनील नरेन, राहुल त्रिपाठी, दीनेश कार्तिक यांनी काही सामन्यांत चांगली खेळी केली असली तरीही त्यात सातत्य नसल्याने त्यांचा संघ अत्यंत बेभरवशाचा बनला आहे. अशा स्थितीत सलामीवीर शुभमन गिलनेच काय ती चमक दाखवली आहे.

चेन्नईबाबत बोलायचे तर या पुढील सामन्यांत त्यांनी मिळवलेले विजय त्यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. चेन्नईचा कर्णदार महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाला स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच प्ले-ऑफ गाठण्यात अपयश आले आहे. संघातील अनेक खेळाडूंनी पस्तीशी, चाळीशी गाठलेली असताना त्यांची कामगिरी सामन्यागणिक खालावल्यामुळेच त्यांच्यावर ही नामुष्कीची वेळ आली आहे.

धोनीसह फाफ डुप्लेसी, शेन वॉटसन, अंबाती रायडू, ऋतुराज गायकवाड, सॅम कुरेन यांनी सरस कामगिरी केली आहे. मात्र, महत्त्वाच्या सामन्यांत त्यांना आपला खेळ उंचावता आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या पहिल्या चार फलंदाजांना बाद करण्यात कोलकाताला यश आले तर हा सामना जिंकणे त्यांच्यासाठी सोपे होणार आहे.

खुद्द कर्णधार धोनीदेखील त्याच्या दर्जाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे या स्पर्धेतून हाती काहीही येणार नसल्याची परिस्थिती ओळखून त्यांच्यावर वर्चस्व गाजवायला कोलकाताला यश आले तर त्यांना हा सामना जिंकून प्ले-ऑफमध्ये स्थान निश्‍चित करणे सोपे
ठरणार आहे.

नरेनची कामगिरी लक्षवेधी 

कोलकाता संघाची मदार फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात सुनील नरेनवर जास्त आहे. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर शंका घेतल्यानंतर त्याच्या चाचणीनंतर त्याला गोलंदाजीसाठी परवानगी दिल्यानंतरही त्याला फारसे यश मिळालेले नाही. मात्र, या सामन्यात त्याची गोलंदाजी निर्णायक ठरणार आहे. या मैदानावरील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करणारी ठरते असा इतिहास असल्याने हा मिस्ट्री गोलंदाज कशी कामगिरी करतो यावरच कोलकाता संघाचे यश अवलंबून आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.