पुणे – आझाद हिंद एक्स्प्रेस रेल्वेच्या बोगीतील स्वच्छतागृहात एके-47 रायफलची 7 जिवंत काडतुसे आणि चार बुलेट्स आढळून आल्या आहेत. पुणे स्टेशन परिसरातील घोरपडी यार्ड येथे रेल्वेची साफसफाई करत असताना मंगळवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला.
कोलकाता ते पुणे स्टेशनदरम्यान आझाद हिंद एक्स्प्रेस धावते. सोमवारी सकाळी कोलकाता येथून आलेली गाडी घोरपडी यार्ड येथे साफसफाईसाठी लावली होती. यावेळी बोगी क्र. एस 2 मधील स्वच्छतागृहाच्या डस्टबीनमध्ये एके-47 रायफलची 7 जिवंत काडतुसे आणि इतर 4 बुलेट्स कर्मचाऱ्यांना दिसून आल्या. स्वच्छता विभागाच्या व्यवस्थापकाने याची माहिती रेल्वे पोलीस फोर्सला दिली. त्यानंतर पुणे विभागाच्या लोहमार्ग पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.