“तुमचं ऐकलं आता माझं ऐकून घ्या” म्हणत अजित पवारांनी विरोधकांना सुनावले

विरोधकांच्या गोंधळावर अजित पवार संतापले

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वैधानिक मंडळावरून विरोधक आक्रमक चांगलेच झाल्याचे दिसून येत आहे. विधानसभेत वादळी चर्चेनंतर विरोधकांकडून सभात्याग करण्यात आला. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही? असे प्रश्न उपस्थित केले. यावर अजित पवारांनीही उत्तर दिले.

“विकास महामंडळ आम्ही स्थापन करु, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. बजेटमध्ये तसा निधी देऊ. आमचं लवकरात लवकर करायचं ठरलं आहे. पण मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आहे ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करु. १० नंबरी काय आणि पुढचा कोणता नंबर लावा तसं अधिवेशन करु,” असे उत्तर अजित पवार यांनी यावेळी दिलं. अजित पवार बोलत असताना विरोधक गदारोळ घालू लागल्यानंतर तुमचं ऐकलं आता माझं ऐकून घ्या म्हणत अजित पवारांनी सुनावलं.

दरम्यान, या अगोदर सुधीर मुनगंटीवार यांनी, “वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही? विदर्भ, मराठवाड्यात महाराष्ट्रातील लोकं राहतात हे लक्षात‌ ठेवावे. विदर्भ, मराठवड्याची जनताही महाराष्ट्राचा भाग आहे. जनतेच्या वतीने डावपेचात वैधानिक विकास मंडळ अडकता कामा नये यासाठी हात जोडून विनंती करतो. या सभागृहात मला करोना होणार नाही म्हणून बसायचं आहे की जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी बसायचं आहे? हे ठरवावं.

अजित पवार यांनी आश्वासन देऊन ७२ दिवस झाले आहेत. आश्वासन पूर्ण करणार आहात की नाही एवढंच सांगावं,” अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली. “हे तर मुख्यमंत्र्यांचं आजोळ आहे, नातवाने पेटून उठलं पाहिजे. १० दिवसांचं अधिवेशन एकदम १० नंबरी झालं पाहिजे,” असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.