प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 3 -महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) घोटाळेबाज उमेदवारांची यादी अखेर परीक्षा परिषदेला जाहीर करावीच लागली. यात तब्बल 7 हजार 874 उमेदवारांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांची “टीईटी’ची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना यापुढे “टीईटी’ परीक्षेला बसण्यास कायमस्वरुपी प्रतिबंधही घालण्यात आला आहे.
19 जानेवारी 2020 रोजी झालेल्या “टीईटी’ परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाला होता. यात परीक्षा परिषदेतील परीक्षा दिलेले उमेदवार, अधिकारी, कर्मचारी, एजंट, परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीचे संचालक यांचा समावेश होता. सायबर पोलिसांनी या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान उत्तरपत्रिकांची कसून तपासणी करण्यात आली असून, त्यात 7 हजार 880 उमेदवारांनी परीक्षेत गैरप्रकार केल्याचे उघड झाले. पोलिसांनी उमेदवारांची यादी व अहवाल शिक्षण विभागाकडे दिला होता. त्यावर शासनाकडून कार्यवाही करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यानुसार ही यादी जाहीर करण्यात आली.
अपात्र असताना निकालात पात्र
परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्या सहीचे कारवाईचे आदेश व उमेदवारांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. 7 हजार 500 उमेदवारांच्या गुणांमध्ये फेरफार करुन अपात्र असताना त्यांना अंतिम निकालात पात्र करण्यात आले. यातील 6 उमेदवारांची नावे दुबार आली आहेत. 293 उमेदवार हे अंतिम निकालामध्ये अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना परीक्षा परिषदेकडून प्रमाणपत्र वितरित झालेले नाहीत. मात्र त्यांनी बनावट प्रमाणपत्र प्राप्त करुन घेतल्याचे अथवा तसा प्रयत्न केलेला आहे.