अकोले (प्रतिनिधी) – लिंगदेव गावात करोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यामुळे संबंधित परिसर प्रशासनाने सील केला असून, गावाला लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
घाटकोपर येथून 15 दिवसांपूर्वी एक शिक्षक लिंगदेव गावी आला होता. ही व्यक्ती स्वतः होऊन संस्थात्मक विलगीकरण कक्षात 10 दिवस राहिली. त्यानंतर घरी आल्यावर या व्यक्तीस खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे ती संगमनेर येथे दवाखान्यात दाखल झाली होती. खासगी लॅबमध्ये या व्यक्तीचा स्त्राव तपासणीसाठी दिला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
याची माहिती मिळताच रविवारी (दि.24) तहसीलदार मुकेश कांबळे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. इंद्रजीत गंभीरे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय घोगरे आदींनी संबंधित शिक्षकाला नगर येथे त्या त्यांच्या मुलासहित तपासणीसाठी पाठवले. नगर येथील तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील उपचारांची दिशा ठरणार आहे.
अकोले तालुक्यात आतापर्यंत संशयित करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता. तथापि, लिंगदेव येथून काल बापलेक नगर येथे हलवले गेल्यानंतर अकोले तालुक्यामध्ये अस्वस्थतेची लाट निर्माण झाली आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत अनेक ठिकाणी संशयित रुग्ण आढळले. अकोले तालुका त्यादृष्टीने सेफ मानला जात होता. किंबहुना धांदरफळ येथील अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या संबंधित व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह आल्याने अकोलेकरांनी सुटकेचा सुस्कारा टाकला होता. पण काल अचानक या सर्व वातावरणाला वेगळे वळण लागले आहे. पण या दरम्यान आज गावाला सर्व बाजूंनी पोलिसांनी वेढले असून, सर्व गावच वाड्या-वस्त्यांसह घरांमध्ये क्वारंटाईन झालेला आहे.
दोन हजार 658 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये आज घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आलेली होती. फापाळेवाडी, हाडवळेवाडी, लहीत शिव-केबल टीकी या वाड्या सील केल्या गेल्या आहेत, अशी माहिती पोलीस पाटील गणेश पवार, हॉलिडे इमेजचे हरिभाऊ फापाळे यांनी सांगितले. संशयीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना फापाळेवाडी शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. आज अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय अधिकारी रोशन पंडित यांनी गावाला भेट दिली. पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, तहसीलदार मुकेश कांबळे व यंत्रणेने मुक्काम ठोकला आहे.