लिमिटेड मोटिव्हेशन

काही दिवसांपूर्वी एका मोटिव्हेशनल सेमिनारला जाण्याचा योग आला. “आर्थिक बचतीकडून समृद्धीकडे जाण्याचा राजमार्ग’, असा त्याचा विषय होता. वक्ते अर्थ क्षेत्रातील दिगज्ज व्यक्तिमत्त्व होते. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या सभागृहात त्या वक्‍त्याने अतिशय सुंदर मार्गदर्शन केले. लोकांचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आणि टाळ्यांची मिळणारी उत्स्फूर्त दाद याने त्या सेमिनारला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते. मलाही तिथे खूप काही शिकायला मिळाले. बचतीचे महत्त्व आणि त्याच्या पद्धती अतिशय नेमकेपणाने वक्त्‌याने मांडल्या होत्या. बचतीच्या सवयी भविष्यात कसा आमूलाग्र बदल घडवून आणतील याबाबत मला पुरतीच खात्री झाली होती. सेमिनार उत्तमपणे पार पडला. आता मी माझे आर्थिक ध्येय कसे साकार करणार याचा विचार करीत होतो. बचत, गुंतवणूक आणि भविष्यातील नियोजन डोळ्यासमोर तरळत होते. मनात आर्थिक चक्रांची बेरीज वजाबाकी सुरु होती. बचत कशाप्रकारे करायची आणि त्यातून उरलेल्या रकमेचे सुनियोजन कसे करायचे याची ब्लु प्रिंट मनात तयार झाली होती. सेमिनार दरम्यानच्या नोंदींनी आठ दहा पाने चांगलीच भरली होती.

घरी आल्यावर घरी त्या सेमिनारमधील उत्तम माहितीबद्दल चर्चा केली. गृहमंत्र्यांना म्हणजेच माझ्या सौभाग्यवतीला आता खर्चावर नियंत्रण कसे आणायचे हे व्यवस्थित समजावून सांगितले. एक अनलिमिटेड मोटिव्हेशन त्यावेळी माझ्या अंगात संचारले होते. ते मोटिव्हेशन कधी एकदाचे प्रत्यक्षात आणतो असे झाले होते.

दुसरा दिवस उजाडला परंतु कालचे मोटिव्हेशन अजूनही तसेच होते अगदी तरतरीत. रोजच्या रोज जमाखर्चाची नोंद होऊ लागली. आठवडा उलटून गेला. त्या दिवशी सायंकाळी माझ्या पत्नीने मला जमाखर्चाची नोंद करण्याची आठवण करून दिली. परंतु काहीतरी कारण देऊन मी वेळ मारून नेली. त्यांनतर आठवडा उलटून गेला तरी त्या वहीची पाने चाळली गेली नाहीत. आठवडाभराने एका योग शिबिराला जाण्याचा “योग’ आला. त्यावेळी माझी पत्नी आणि मुलगी माझ्या समवेत होती. त्या शिबिरांनंतर मी सहजच माझ्या पत्नीला म्हणालो उद्यापासून नियमितपणे प्राणायाम करायचे बरं का. त्यावर माझी पत्नी मला म्हणाली, आता हे नाटक किती दिवसांसाठी? अहो, म्हणजे ते मागचे जमा खर्च लिहिण्याचा खटाटोप आठवडाभरच चालला ना. आता याला काय म्हणायचं लिमिटेड मोटिव्हेशन?

आता मात्र मी शांत झालो. आजपर्यंत आपण असे संकल्प कित्येकदा आखले परंतु ते अगदी महिनाभराच्या पुढे जाऊ शकले नाहीत याचे स्मरण झाले. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक संकल्प येत असतात. आपण एखाद्या संकल्पाचा श्रीगणेशा करतो खरा. परंतु कोणाचा गणपती दीड दिवसाचा तर कोणाचा पाच दिवसांचा. आपण ते पूर्ण करण्यात अयशस्वी ठरतो. अनेकदा आपण चित्रपट, नाटके, पुस्तके, प्रसंग, व्याख्याने, कोर्सेस आणि इतर माध्यमातून प्रचंड मोटिव्हेट होत असतो. परंतु ते मोटिव्हेशन सातत्याने टिकवून ठेवणे आपल्याला शक्‍य होत नाही.

म्हणजेच काय तर जसजशी वेळ पुढे सरकते तसतसे ते मोटिव्हेशन, ती प्रेरणा पुसट होत जाते. यात अनेक संकल्प, ध्येये आणि उद्दिष्टे असतात. जी कागदावर अगदी आखीव रेखीव येतात पण प्रत्यक्षात मात्र कधीही येत नाहीत.
आता प्रश्न पडतो, हे का बरं असं होत असावं? हे तर प्रत्येकाच्या बाबतीतच कधी ना कधी घडतच असतं. याचे उत्तर अगदी सोपे आहे आणि ते म्हणजे आपल्या कधीही न मरणाऱ्या सवयी आणि सातत्याचा अभाव. कारण मोटिव्हेशन कालांतराने मारते परंतु सवयी मरत नाहीत. आता नक्की कोणत्या सवयी? तर चालढकल पणा, बेफिकीर वृत्ती, संयमाचा अभाव, अस्थिर व चंचल मन, ध्येयहीन दृष्टिकोन आणि आत्मविश्‍वासाचा अभाव या सवयी. मोटिव्हेशन संपते परंतु या सवयी संपत नाहीत. परिणामी मोटिव्हेशन लिमिटेड ठरते आणि सवयी मात्र अगदी तशाच मजबूत राहतात.

यासाठीच आपण आपल्या मोटिव्हेशनला मारक ठरणाऱ्या सवयी बदलल्या पाहिजेत. त्या सवयी बदलून किंवा सोडून एक उमेद मनात जागविली पाहिजे. एक अशी उमेद जी एका ध्येयासाठी, संकल्पपूर्तीसाठी तशीच राहील. ऊर्जादायी आणि सकारात्मक. आपल्या आजूबाजूला यशासाठी पूरक अनलिमिटेड अपॉर्च्युनिटीज आहेत. फक्त आपल्यातील सवयी आपल्या लिमिटेड मोटिव्हेशनला कारणीभूत ठरत आहेत हे लक्षात घ्यायला हवे.

सागर ननावरे

Leave A Reply

Your email address will not be published.