मुंबई, – खासदार नवनीत राणा या मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल असताना त्याचे जेव्हा एमआरआय स्कॅनिंग करण्यात आले, त्यावेळी त्यांचे तेथे फोटोसेशन करण्यात आले होते. रुग्णालयाच्या कार्यपद्धतीनुसार असे करता येत नाही तरीही नवनीत राणा यांना तशी अनुमती कशाच्या आधारावर दिली गेली? असा प्रश्न शिवसेना नेत्यांनी त्या रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडे उपस्थित करीत त्यांना आज चांगलेच फैलावर घेतले.
आज या प्रकरणात लिलावती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे आणि अन्य शिवसेना नेते तिकडे गेले होते. त्यावेळी महापौरांनीही अनेक तांत्रिक बाबी उपस्थित करीत राणांच्या फोटो सेशनला जोरदार हरकत घेतली.
मनिषा कायंदे यांनी त्या अधिकाऱ्यांना सुनावले की तुमचे रुग्णालय खासगी असले तरी एमआरआय सारख्या प्रक्रियेच्या बाबतीत सरकारी नियमांचे पालन झालेच पाहिजे. यावर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आपली चूक कबूल केली आहे. तथापि नवनीत राणा यांचा फोटो काढण्यात आला त्यावेळी ही एमआरआय मशिन सुरू नव्हती असा खुलासा त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात लिलावती रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेतर्फे आरोग्य मंत्रालयाकडे केली जाण्याची शक्यता आहे.