पावसाळ्याप्रमाणे लांबू शकतो हिवाळ्याचाही मुक्‍काम

शुक्रवारपासून कडाक्‍याची थंडी

पिंपरी – यंदा लांबलेला पावसाळा आणि त्यानंतर झोडपलेल्या परतीच्या पावसाचा परिणाम हिवाळ्यातही दिसू शकतो. यामुळे यंदा हिवाळासुद्धा लांबण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. येत्या 22 नोव्हेंबरपासून पुणे-पिंपरी-चिंचवड व राज्यातील बहुतांश ठिकाणी थंडी वाढणार असल्याचे पुणे वेधशाळेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दिवसा ऊन तर, रात्री गारठा अनुभवण्यास मिळत आहे. तर, सकाळी धुकेही पडत असल्याने नागरिक त्याचा आनंद घेतांना दिसत आहे. यापुढे थंडीचा जोर वाढत जाणार असून पारा खूप खाली घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. येत्या दोन दिवसात तापमानाची पातळी आणखी खालवणार असून, थंडीची तीव्रता वाढणार आहे. रविवारी (दि. 17) पारा 14 अंशापर्यंत खाली घसरला होता. दिवसभर कडक उन्हाचा अनुभव व रात्री गारठ्याचा अनुभव येत आहे. मात्र, अजूनही नोव्हेंबर महिन्यातील कडाक्‍याची थंडी पडलेली नाही.

दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात चांगली थंडी पडत असते. मात्र, यंदा पावसाळा लांबल्याने थंडीची सुरुवातही लांबणीवर पडली आहे. सोमवारपासून तापमानात हळूहळू घट होऊन 22 नाव्हेंबरपर्यंत कडाक्‍याची थंडी पडणार असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. यंदा पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याच्या पॅटर्नमध्ये काहीसा बदल झाल्याने गेल्या वर्षीपेक्षा जास्त थंडी पडणार असून मार्च महिन्याअखेरपर्यंत पाच महिने किंवा त्यापेक्षा जास्त थंडीचा जोर कायम राहणार असल्याचे मत ज्येष्ठ तज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्‍त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.