मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. आता मलिक यांनी पुन्हा एक खळबळजनक आरोप केला आहे. मलिक यांनी केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केला आहे. केंद्रीय यंत्रणा लोकांना माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला लावत आहेत. ते अनिल देशमुख यांच्यासोबत जो खेळ झाला तो माझ्यासोबतही करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.
नवाब मलिक यांनी, “दोन महिने झाले, आर्यन खान प्रकरणात आम्ही चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. तेव्हापासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर पाळत ठेवली जात आहे. याबाबत एकाचा पाठलाग आमच्या हितचिंतकांनी केला. त्यावेळी ते पळाले. या संशयितांची माहिती ट्विटरवर अनेकांनी दिली आहे. या लोकांचे ट्विटर हँडल पाहिले असता ते भाजपाशी संबंधित असल्याचे दिसत आहे.”
यह लोग इस गाड़ी में सवार पिछले कुछ दिनों से मेरे घर और स्कूल की ‘रेकी’ कर रहे हैं.
अगर कोई इन्हें पहचानता हो तो मुझे जानकारी दे.
जो लोग इस तस्वीर में हैं, मेरा उनसे कहना हैं कि, तुम्हें मेरी कोई जानकारी चाहिए तो आकार मुझसे मिले, मैं सारी जानकारी दे दूँगा pic.twitter.com/ZAmJhqEWoL— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 26, 2021
“अनिल देशमुख यांच्याबरोबर जसा खेळ झाला तसंच सुरू झालं आहे. याबाबत माझ्याकडे महिती आली आहे. याबाबत माहिती पोलिसांना देण्यात येईल,” असेही ते म्हणाले. “जर केंद्रीय यंत्रणेचा वापर करत मंत्र्यांवर असे डाव खेळले जात असतील, घाबरवलं जात असेल तर हे सहन करणार नाही. माझ्याकडे केंद्रीय अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअॅप चॅट आहेत. याबाबत मी अमित शाह यांना पत्र लिहिणार आहे,” असेही मलिकांनी नमूद केले आहे.
नवाब मलिक म्हणाले, “काही पक्षाचे कार्यकर्ते माझ्या घराची, कार्यालयाची आणि माझे लहान नातू कोणत्या शाळेत जातात याची माहिती काढत असल्याचं मला कळालं. मागच्या आठवड्यात मी दुबईत असताना दोन जण कॅमेरा घेऊन माझ्या घराचे फोटो काढत होते. तेव्हा घराच्या परिसरातील लोकांनीच त्यांना अडवलं. त्यानंतर ते पळू लागले. त्यांना टिळक टर्मिनस येथे पकडण्यात आलं.”
“मी ट्विटरवर या लोकांचे फोटो टाकले त्यानंतर या २ पैकी एकाची माहिती समोर आली आहे. ही एक व्यक्ती मागील २ महिन्यापासून राज्यात जे सुरू होतं त्यावरून माझ्या विरोधात ट्वीट करत होता. त्याचं नावही समोर आलंय. या प्रकरणी मी पोलिसांकडे तक्रार देणार आहे. मी जेव्हा कुठं कागदपत्रे काढायला जातो किंवा कोणत्याही विभागात तक्रार करायला जातो तेथे ठिकठिकाणी यातील एक व्यक्ती दिसून आला आहे. त्यांना नेमकं काय करायचं आहे?”
दरम्यान, नवाब मलिक म्हणाले होते, “या गाडीत बसलेले हे लोक मागील काही दिवसांपासून माझं घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत. जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्या. या फोटोत असलेल्या लोकांनी मला येऊन भेटावं, मी सर्व माहिती देतो असंच माझं त्यांना सांगणं आहे.”