पिंपरी, दि. 17 – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि लाइटहाऊस कम्युनिटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या कौशल्य विकास प्रकल्पा अंतर्गत गेल्या दिड वर्षांत 450 तरुण-तरुणींना विविध कोर्सचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे यात 85 टक्के महिलांचा सहभाग आहे.
याबाबत महापालिकेचे समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, पिंपरी लाइटहाऊस प्रकल्पाच्या मुख्य श्रुतिका मुंगी यांनी माहिती दिली. शहरातील झोपडपट्टी भागातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरी महापालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटी फाऊंडेशनच्या वतीने सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये मार्च 2021 मध्ये लाइटहाऊस प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पामध्ये ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन, फायनान्शियल आकाऊंटिंग विथ टॅली, डिजिटल मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंट, ग्राफिक डिझायनिंग, मोबाइल रिपेअरिंग, जावा, सॉफ्टवेअर टेस्टिंग, पायथॉन, क्लाऊड कंम्प्युटिंग, कंम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग ऍण्ड लॅपटॉप रिपेअरिंग, फॅशन डिझाईन, ब्युटी पार्लर, मेकअप आर्टिस्ट यासारखे विविध 90 कोर्सेस शिकविले जातात. गेल्या दिड वर्षांत 950 मुलांना मोफत प्रशिक्षणाचे काम सुरू आहे. यामधील 450 मुलांना विविध कोर्सचे प्रशिक्षण देऊन विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला आहे. 300 मुलांचे कोर्स सुरू असून 200 मुलांचे प्राथमिक कोर्स सुरू आहे. लाइटहाऊसमध्ये दर दोन महिन्यांनी जॉब फेअरचे आयोजन करण्यात येते. यामध्ये कौशल्य प्राप्त मुलांना रोजगार दिला जातो. पिंपरीतील या प्रकल्पासाठी ऍटलास कॉपको कंपनीच्या सीएसआर फंडातून मदत केली जात आहे.
करोनामुळे विधवा झालेल्या 17 महिलांना रोजगार
करोनामध्ये पतीचे निधन झाल्यानंतर कुटुंबाचा आधारवड गेल्याने महिलांपुढे आर्थिक संकट कोसळले होते. करोनात विधवा झालेल्या 30 महिलांना लाईटहाऊसमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामधील आत्तापर्यंत 17 महिलांना रोजगार मिळवून दिला असून त्यांच्या त्यावर उदरनिर्वाह सुरू आहे.
खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण
या प्रकल्पामध्ये महिलांचा सहभाग अतिशय उल्लेखनीय आहे. पूर्वी महिलांना रोजगार म्हणजे केवळ ब्युटी पार्लर, भरतकाम, शिवणकाम असे काहीसे प्रशिक्षण दिले जात होते. परंतु आता लाइटहाऊस अंतर्गत महिलांना थेट कंपन्यांमध्ये रोजगार मिळावा किंवा स्वयंरोजगार सुरू करता यावा, असे ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन, फायनान्शियल आकाऊंटिंग विथ टॅली, डिजिटल मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंट, ग्राफिक डिझायनिंग, मोबाइल रिपेअरिंग, जावा, सॉफ्टवेअर टेस्टिंग, पायथॉन, क्लाऊड कंम्प्युटिंग, कंम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग ऍण्ड लॅपटॉप रिपेअरिंग असेही प्रशिक्षण दिले जात असून खऱ्या अर्थाने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होताना दिसून येत आहे.
प्रत्येक प्रभागात एक लाईटहाऊस प्रकल्प उभारणार
महापालिकेचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सांगितले की, पुणे शहरात प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 1 लाईटहाऊस प्रकल्प आहे. याच धर्तीवर पिंपरी महापालिकेचाही आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत एक लाईटहाऊस प्रकल्प उभा करण्याचा मानस आहे. सध्या पिंपरी, निगडी येथे हे प्रकल्प सुरू झाले आहेत. तर चिंचवडमध्ये याचे काम सुरू असून भोसरी जागेसंदर्भात पाहणी झाली आहे.