पुणे – रिमझिम आणि संततधार पावसामुळे शहरासह उपनगरांतील हवामान दमट झाले असून, सोमवारी (दि. २) सकाळपासून ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरी पडल्या. एनडीए आणि पाषाण परिसरात २ मिमी पावसाची नोंद झाली, तर शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, हडपसर आणि वडगावशेरी येथे १ मिमी पाऊस झाला. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मागील आठवड्यात शहरासह जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाल्याने दिवसभर ऊन आणि दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी असे वातावरण होते. मात्र, दोन दिवसांपासून पुन्हा पावसाच्या हलक्या, तर काही भागात मध्यम सरींमुळे गारवा वाढला आहे. शहरातील वाढलेल्या कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी घट झाली असून, पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.