मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्‍या सरी

मुबई : देशात अगोदरच पावसाळा लांबल्याने हिवाळा उशिराच सुरू झाला आहे. त्यातही आज सकाळपासून मुंबई उपनगरात पावसाच्या हलक्‍या सरी कोसळत आहेत. पावसाळा संपल्यानंतरही सुरु असलेला पाऊस अद्यापही थांबलेला नसून मुंबईकरांना ऐन हिवाळ्यात छत्री घेऊन घराबाहेर पडावे लागत असल्याचे दिसत आहे. हवामान खात्याकडून मुंबई शहरासह उर्वरीत महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अरबी समुद्रामध्ये आगामी 24 तासांत पवन आणि अम्फन ही दोन चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने, मुंबई, पुणे व नाशिक या प्रमुख शहरांमध्ये गुरुवारी पाऊस पडणार असल्याचे स्कायमेटकडून सांगण्यात आले होते.

पूर्व मध्य अरबी समुद्रात आणि दक्षिण पश्‍चिम अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावी क्षेत्राचे रूपांतर गुरुवारी दुपापर्यंत चक्रीवादळात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत अरबी समुद्रात एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पवन आणि अम्फन अशी या वादळांना नावे देण्यात आली आहेत या चक्रीवादळांच्या पार्श्वभूमीवर कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या काळात किनारपट्टीवर ताशी ते किमी वेगाने वारे वाहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गुरुवारी मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

कयार आणि महा चक्रीवादळांनंतर पुन्हा तशीच स्थिती अरबी समुद्रात निर्माण झाली आहे. यंदा अरबी समुद्रात चार, तर बंगालच्या उपसागरात तीन अशी सात चक्रीवादळांची निर्मिती झाली. त्यात पवन व अम्फन यांची भर पडल्यास एकूण चक्रीवादळांची संख्या नऊ होईल. पवन चक्रीवादळ सोमालियाच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. प्रथम उत्तर पश्‍चिम दिशेला व नंतर पश्‍चिम दिशेने हे वादळ पुढे सरकेल. तर अम्फन वादळ पूर्व-मध्य अरबी समुद्रात निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि दक्षिण गुजरातच्या विविध भागांत येत्या तासांत हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.