पुणे – शहरात आज दिवसभरात ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी पडल्या. तर काही भागात पावसाने उघडीप दिली. मात्र, जिल्ह्यात पावसाच्या मध्यम सरींमुळे शेतकरी सुखावला आहे. लोणावळा, माळीन, खेड या भागात पावसाच्या एक ते दोन जोरदार सरी पडल्या. तर अधून-मधून हलक्या सरी पडत होत्या.
गेल्या २४ तासांत शहरातील शिवाजीनगर, एनडीए, कोरेगांव पार्क, वारजे, कोथरूड, पाषाण या भागात हलक्या ते मध्यम सरींमुळे हवेत गारवा वाढला होता. मात्र, शनिवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे पाषाण आणि एनडीए परिसरात एक मिमी पावसाचीही नोंद झाली नाही. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात पावसाच्या हलक्या आणि मध्यम सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
गेल्या २४ तासांतील पाऊस
लोणावळा – २५, निमगिरी आणि माळीन – १२, खेड – ८, राजगुरूनगर – ५, चिंचवड – ४, लवळे – ३, पुरंदर – २, पाषाण, एनडी आणि शिवाजीनगर – १ मि.मी.
घाटमाथ्यावर जोर वाढला
मागील तीन ते चार दिवसांपासून घाटमाथा परिसरात पावसाचा कमी झालेला जोर शनिवारी सकाळपासून काहीसा वाढला. गेल्या २४ तासांत ताम्हिणी आणि दावडी घाट परिसरात ७५ मिमी पावसाची नोंद झाली. भिरा येथे ५७, लोणावळा परिसरात ४२, शिरोटा येथे ४४, वळवण भागात ४०, अंबवणे येथे ५२ मिमी पावसाची नोंद झाली.