पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. महापालिक व पुणे सिटी कनेक्ट डेव्हल्पमेंट यांच्यातर्फे लाईट हाऊस रोजगारनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये 18 ते 30 वयोगटातील तरुण-तरुणींना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
लाईट हाऊस म्हणजे दिशादर्शक. तरुणांना योग्य दिशा दाखवून त्यांना रोजगार मिळण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी लागणारे मनुष्यबळ, संगणक व इतर सुविधा महापालिकडून देण्यात येणार आहेत. लाईट हाऊस हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पहिल्या टप्यामध्ये झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागाच्या पहिल्या मजल्यावर सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पिंपरीगाव येथील महापालिका शाळेच्या इमारतीमध्ये हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुढे टप्याटप्याने पाच वर्ष लाईट हाऊस हा प्रकल्प तरुणांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी राबविण्यात येणार आहे.
यामध्ये पुणे सिटी कनेक्ट डेव्हलपमेंट स्वतंत्र कर्मचारी वर्गाची नेमणूक करणार आहे. या उपक्रमाला लोकसहभाग मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या नागरवस्ती विभागाचे समूहसंघटक मदत करणार आहेत. नागरवस्ती विभागाचे सहायक आयुक्त या प्रकल्पाचे कामकाज पाहणार आहेत. तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळून त्यांना रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. गुरुवारी झालेल्या महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला आहे.