- ‘अ’ प्रभाग कार्यालयातील प्रकार
पिंपरी – महापालिकेच्या “अ’ प्रभाग कार्यालयात आढावा बैठकीसाठी जात असलेल्या नगरसेविका अनुराधा गोरखे यांना लिफ्टमधून जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे त्याबाबत माजी प्रभाग अध्यक्ष तथा नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी संताप व्यक्त केला आहे.
आयुक्त राजेश पाटील यांनी प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 14 मधील सर्व नगरसेवक व अधिकारी यांची दोन्ही प्रभागातील कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलविली होती. नगरसेविका गोरखे या संबंधित बैठकीला जाण्यासाठी लिफ्टजवळ गेल्या होत्या. त्या वेळी शिपाई कर्मचाऱ्याने त्यांना लिफ्टमध्ये जाण्यास मनाई केली. दरवाजाला आडवा हात लावून सांगितले की लिफ्टमध्ये फक्त आयुक्त जाणार आहे. दुसरे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. अनुराधा गोरखे यांनी त्या शिपाई कर्मचाऱ्यास मी या प्रभागाची माजी अध्यक्ष असून विद्यमान नगरसेविका असल्याचे निदर्शनास आणून दिले. मला बैठकीसाठी जायचे असल्याने जाऊ द्यावे, असेही स्पष्ट केले. त्यानंतरही संबंधित कर्मचाऱ्याने त्यांना लिफ्टमध्ये जाण्यास नकार दिला. चार ते पाच मिनिटे गोरखे या शिपाई कर्मचाऱ्याशी वाद घालत असतानाच एका दुसऱ्या शिपाई कर्मचाऱ्याने गोरखे यांना लिफ्टमध्ये जाण्यास सहकार्य केले.
गोरखे यांनी याबाबत माहिती घेतली असता कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की, प्रशासन अधिकारी यांनी याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्यावर माझ्यासोबत कर्मचारी असे वागत असतील तर सामान्य नागरिकांबरोबर ते कसे वागत असतील?, असा प्रश्न गोरखे यांनी उपस्थित केला. हे वागणे बरे नव्हे, अशी भूमिका घेत त्यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.