इंदोरी – इंदोरी येथे पतंगाच्या दोऱ्यामध्ये अडकून पडलेल्या काळा अवाक या दुर्मिळ पक्षाला पक्षीप्रेमी अंकुश ढोरे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवदान दिले.
इंदोरी येथील इंद्रेश्वर मंदिराच्या परिसरात असणाऱ्या तळ्याच्या ठिकाणी पतंगाच्या दोऱ्यात अडकलेल्या अवस्थेत एक आगळा वेगळा पक्षी ढोरे यांना दिसला. तेथे काही कुत्री त्यावर भुंकताना त्यांना दिसले, यामुळे पक्षी घाबरून गेल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच त्या पक्षाकडे धाव घेत त्याला पतंगाच्या दोऱ्यातून सुखरूप बाहेर काढत त्याला त्याच्या मोकळ्या मैदानात स्वतंत्र करून दिले.
काळा अवाक हे पक्षी भारताच्या मुख्य भूमीत, कोरड्या हवामानाच्या प्रदेशात आढळतात. नद्या, तलाव, भातशेतीच्या प्रदेशात तसेच दलदली भागात राहणे याला पसंत असले तरी हा एवढ्या पाण्यावर अवलंबून नसतो. पाण्याजवळच्या भागातही आपले खाद्य शोधत फिरतो. सहसा एकाच प्रदेशात राहणे याला पसंत आहे. हा आपला प्रदेश सोडून अन्य ठिकाणी जात नाही. काळा अवाक जोडीने किंवा थव्याने राहणे पसंद करतो.