करोनाकाळात लाईफस्टाईलशी निगडीत आजारांचेच प्राबल्य

जीवनशैलीशी निगडित आजार कोव्हिड-19 चा धोका वाढवतात

  • अमोल नाईकवडी

महाराष्ट्रातील लोक मधुमेह (27 टक्‍के), बी12 जीवनसत्वाची कमतरता (23 टक्‍के) डिस्लिपिडेमिया (17 टक्‍के), लठ्ठपणा (13 टक्‍के) अशा आजारांबरोबर हृदयविकार (10 टक्‍के) आणि ऍनिमिया (10 टक्‍के) या आजारांचे बळी ठरण्याची शक्‍यता अधिक असल्याचे जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने प्रकाशित केलेल्या ट्रेण्ड रिपोर्टमधून दिसून आले आहे.

गुणसूत्रांच्या रचनेसारखी काही बदलता न येण्याजोगी धोक्‍याची कारणे आणि त्यांना पर्यावरण, वय, लिंग, ताणतणाव आणि शारीरिक स्थिती, चयापचय क्षमता यांसारख्या व्यक्तिविशिष्ट कारणांची मिळालेली जोड यांमुळे या जीवनशैलीशी निगडित आजारांना सुरुवात होते वते हळूहळू अधिकाधिक गंभीर रूप धारण करू लागतात. या पाहणीसाठी ऑक्‍टोबर – फेब्रुवारी या कालावधीमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या केलेल्या लोकांच्या नमुना गटाचा अभ्यास करण्यात आला.

यामध्ये पुण्यातील एकूण 3306 लोकांच्या नमुना गटाचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार मधुमेह (28 टक्‍के), बी12 जीवनसत्त्वाची कमतरता (26 टक्‍के), डिस्लिपिडेमिया (15 टक्‍के), या आजारांपाठोपाठ लठ्ठपणा (12 टक्‍के), ऍनिमिया (10 टक्‍के) आणि हृदयविकार (4 टक्‍के) जडण्यास पूरक स्थिती असल्याचे दिसून आले.

भारतात मधुमेह आणि कार्डिओव्हॅस्क्‍युलर आजारांचा प्रादुर्भाव आहे. हे आजार लोकांच्या अत्यंत क्रियाशील, उत्पादनक्षम वर्षांवर परिणाम करतात आणि त्याचे सामाजिक व आर्थिक परिणाम अशा व्यक्तींना सोसावे लागतात. याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकार यांसारखे जीवनशैलीशी निगडित आजार हे कोव्हिड-19 चा धोका मोठ्या प्रमाणात वाढविणारे आहेत आणि म्हणूनच विशेषत: सध्याच्या काळामध्ये या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे सुयोग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सार्स कोव्ह-19 विषाणूच्या संपर्कात येणे हाच कोव्हिड-19 ची लागण होण्यासाठीचा सर्वाधिक निर्णायक घटक आहे, हे खरे असले तरीही या आजाराला तुमचे शरीर कसा प्रतिसाद देते यावर इतर संभाव्य घटक परिणाम करू शकतात. या धोकादायक घटकांमध्ये कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती, इतर आजार आणि वय या घटकांचा समावेश आहे. विशिष्ट जनुकीय रचनेचाही कोव्हिड-ला शरीराकडून दिल्या जाणा-या प्रतिक्रियेवर परिणाम होऊ शकतो. हे घटक व्यक्तीच्या रोगप्रतिकारशक्तीचे कार्य प्रभावित करत असतात व त्यानुसार त्या व्यक्तीला हा आजार होण्याची शक्‍यता इतरांच्या तुलनेत कमी किंवा जास्त असू शकते. म्हणूनच लोकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे महत्त्व जाणले पाहिजे आणि इतर आनुषंगिक आजारांवर देखरेख ठेवण्यासाठी, त्यांना दूर ठेवण्यासाठी वेळच्यावेळी आणि नियमितपणे तपासण्या करण्यासाठी वेळ दिला पाहिजे.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना बी12 जीवनसत्त्वाची कमतरता (22 टक्‍के), ऍनिमिया (18 टक्‍के), लठ्ठपणा (13 टक्‍के) हे आजार जडण्याची शक्‍यता अधिक असते. पुरुषांना मधुमेह (29 टक्‍के) आणि हृदयविकार (12 टक्‍के) जडण्याची शक्‍यता अधिक असते. वैयक्तिक आरोग्याच्या गरजा गंभीरपणे पूर्ण करण्याची नेमकी गरज कशासाठी आहे हे या डेटामधून ठळकपणे सामोरे आले आहे. आरोग्य म्हणजे शारीरिक, सामाजिक व मानसिक स्वास्थ्य आणि आजारांचा अभाव.

म्हणूनच…
1. खात्रीने नियमित तपासण्या आणि फॉलो-अप्स करा
2. आपल्या शरीराच्या गरजेनुसार आहार ठरवा
3. जीवनशैलीतील बदलांविषयीची उद्दिष्टे आखून ती पूर्ण करा
4. आपल्या रोगप्रतिकारशक्ती कणखर ठेवा म्हणजे आजारांपासून संरक्षण मिळेल.

स्वास्थ्याची जपणूक आणि जीवनशैलीशी निगडित आजारांना प्रतिबंध तसेच युवा पिढीमध्ये निरोगी आयुष्य जगण्याची संस्कृती निर्माण करणे या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जायला हवे. जीवनशैलीशी निगडित आजारांच्या उपचारांवरील खर्च कमीत-कमी राखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांमध्ये गुंतवणूक करणे. हा खर्च आजार बरा करण्यावर होणा-या अवाढव्य खर्चाच्या तुलनेत अगदीच नगण्य असतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.