Life With Corona : प्रवासात नियोजन हवेच

– कल्याणी फडके 

सामान्यांच्या प्रवासाचे विश्‍वासार्ह साधन अशी एसटीची ओळख. गच्च भरलेली, प्रवाशांच्या कलकलाटाने गजबलेली एसटी ही प्रवाशांच्या परिचयाची, पण आता ही परिस्थिती येथून पुढे नसेल. कारण सोशल डिस्टन्सिंग पाळणे आता “लालपरी’मध्ये अनिवार्य असेल. त्यामुळे प्रवासाची पद्धत आणि एसटीचे वेळापत्रक यांच्यात बदल अपरिहार्य असेल.

प्रवासी वाहतूक लॉकडाऊनमुळे सुमारे दोन महिने बंदच! लॉकडाऊन 4 मध्ये काही ठिकाणी शिथिलता दिल्यानंतर, काही भागांमध्ये एसटी वाहतूक सुरू करण्यात आली. या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, सुपा आदी ठिकाणी फेऱ्या सुरू केल्या. मात्र, सध्या प्रवाशांचे प्रमाण अत्यल्प आहे.

सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य
प्रवाशांना शारीरिक अंतर ठेवतच प्रवास आवश्‍यक असेल. एका एसटीत 22च प्रवासी असतील. त्यामुळे गच्च भरलेली एसटी ही संकल्पना यापुढे पाहायला मिळणार नाही. त्यामुळे नियोजनाशिवाय प्रवास अशक्‍य असेल. कारण एखाद्या दिवशी बसला गर्दी झाल्यास 22 जणांपुढील प्रवाशांना थांबावे लागेल.

लहान मुलांच्या प्रवासास अडचण
एका सीटवर एक जण तोही झिकझॅक पद्धतीने. अशीच आसन व्यवस्था किमान पुढील काही महिने असेल. त्यात अवखळ लहान मुलांना प्रवासास नेणे जिकिरीचे असणार आहे. कारण ती मुले एका जागेवर बसणार नाहीत. त्यांना वेगळ्या बाकावर बसवणे आवश्‍यक असणार आहे.

खाद्यपदार्थ सोबत बाळगावे लागणार
बसस्थानकात मिळणारे खाद्यपदार्थ सुरक्षिततेच्या कारणास्तव कमी होणार आहेत. त्यामुळे प्रवासाच्या काळात खाद्यपदार्थही सोबत बाळगावे लागणार आहेत. शिवाय स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी स्वत:लाच वाहावी लागणार असल्याने सर्व निर्बंधांचे कसोशिने पालन करणे अनिवार्य असेल.

एसटीमध्ये घ्यायची खबरदारी
– प्रवास करताना मास्क बंधनकारक
– प्रत्येक प्रवाशाचे थर्मल स्क्रिनिंग होणार
– प्रवाशांनी शारीरिक अंतर ठेवणे आवश्‍यक

पुणे जिल्ह्यात करोनाची रुग्ण संख्या अधिक असल्याने सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होईल. अनेक जण सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य कमी देण्याची शक्‍यता आहे. एसटीतून प्रवास करताना देखील नागरिकांना योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. एका आसनावर दोन ऐवजी आता एकाच प्रवाशाला बसता येणार आहे. यासाठी प्रशासनाकडून तसे नियोजन करण्यात येत आहे. याशिवाय येत्या काळात प्रत्येक एसटी स्थानकांत “थर्मल स्क्रिनिंग’करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थानकांवर शारीरिक अंतर पाळण्यासाठी “मार्किंग’ सुरू आहे. सॅनिटायझरची व्यवस्था देखील केली आहे.
– यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, पुणे विभाग

Leave A Reply

Your email address will not be published.