Life With Corona : पोलिसांपुढील आव्हान कडवे

– संजय कडू 

प्रत्यक्ष रस्त्यावर पोलीस अधिकारी आणी कर्मचाऱ्यांनी करोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी चार हात करत आहेत. त्यांना अनेकदा नागरिकांचा रोषही पत्करावा लागला. प्रत्येक वेळी येणारे वेगवेगळे आदेश आणि नियमांची अंमलबाजवणी करत आहेत. प्रत्यक्षात रस्त्यावर कायदा सुव्यवस्था संभाळण्याचे काम करणाऱ्या खाकी वर्दीला सर्वाधिक धोका असणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस दलाला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल करावे लागणार आहेत. कायदा सुव्यवस्था संभाळताना तसेच गुन्हेगारांना हाताळताना करोनाला मात्र दूर ठेवण्याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात सातत्याने सर्वसामान्य नागरिकांच्या संपर्कात राहिल्याने पोलीस दलातही करोनाचा शिरकाव झाला. कर्तव्य पार पाडत असताना अनेकांना लागण झाली तर काहींचा मृत्यू झाला. यामुळे पोलीस कर्मचारी स्वत:ची खबरदारी वैयक्तिक पातळीवर घेत असताना कुठे तरी कमी पडत असल्याचे दिसत होते.

ही बाब लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी पोलिसांच्या सुरक्षेसाठी जागतिक स्तरावरील नियम, प्रतिबंधात्मक उपाय आदींची माहिती घेऊन पोलिसांना कर्मचाऱ्यांना कर्तव्य पार पाडताना वेळोवळी खबरदारीच्या उपयायोजनांची माहिती दिली गेली. यासाठी सुरुवातीला तोंडी नियमावली नंतर हळूहळू लिखीत स्वरूपात नियमावली करण्यात आली.

नियमावलीचे सुरुवातीला तीन सेट करण्यात आले. यानंतर चौथा फायनल सेट करण्यात आला. यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि दोन पोलीस उपायुक्त यांची समिती नेमली. या समितीने नियमावलीमध्ये सातत्याने अपडेट करून व प्रत्यक्षात रस्त्यावर कर्तव्यात असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनुभवावरून त्याचे डॉक्‍युमेंटेशन केले. हे डॉक्‍युमेंटेशन बुधवारी पोलीस महासंचालकांकडे सुपूर्त करण्यात आले आहे.

– प्रत्येक पोलीस ठाण्यात आजारी पोलिसांची माहिती व काळजी घेण्यासाठी अधिकारी
– गुन्हेगारांना हाताळताना घ्यावयाची काळजी
– गर्दी किंवा सिग्नल यंत्रणेवर कार्यरत असताना घ्यायची काळजी
– दैनंदिन कामकाजात सोशल डिस्टंस, मास्क, सॅनिटायझर वापराच्या सूचना
– ऑनलाईन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करणे
– पोलिसांच्या वेबसाईटवर जास्तीत जास्त ऑन लाईन पद्धतीने तक्रारी स्वीकारणे

लॉकडाऊनच्या कालावधीत पोलीस यंत्रणेला कामकाज करताना प्रत्यक्षात कोणत्या अडचणी येत होत्या याची दखल घेतली गेली. सुरुवातीला करोनाशी लढण्यासाठी तोंडी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. यानंतर एक समिती नेमून कामकाजासंदर्भात नियमावली तयार करण्यात आली. या नियमावलीचे डॉक्‍युमेंटेशन करण्यात आले असून त्याची प्रत पोलीस महासंचालकांकडे सुपूर्त करण्यात आली आहे. जेणेकरून या नियमावलीचा सर्व पोलीस दलाला उपयोग होऊ शकतो.
– डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त, पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.