– व्यंकटेश भोळा
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांसह बहुतांश विद्यापीठांनी 50 टक्के ऑनलाईन शिक्षण निश्चित केले आहे. उच्च शिक्षणात ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व वाढेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही “ऑनलाईन’ अध्ययनाची सवय लावून घ्यावी लागेल.
ऑनलाईन पोर्टल वाढणार
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने करोनापूर्वीच दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणासाठी स्वयंम् सारख्या अनेक पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना वर्गात न जाताही अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुविधा प्राप्त आहे. या सारख्या पोर्टलवरून शिक्षण घेण्याचे प्रमाण यापुढे वाढेल. अशीच पोर्टलची तयार करून विद्यापीठ व महाविद्यालयांना अध्यापन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्राध्यापकांना अध्यापन शैलीत बदल करणे काळाची गरज बनली आहे. त्यासाठी इ-कंटेन्टवर भर द्यावा लागणार आहे.
महाविद्यालये विविध सत्रात
येत्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालये सकाळ, दुपार आणि सायंकाळच्या सत्रात घ्यावी लागणार आहेत, एकाच वेळी महाविद्यालयात वर्ग घेणे ही संकल्पना कालबाह्य होण्याची शक्यता आहे. मुळात वरिष्ठ महाविद्यालयात वर्गातील उपस्थिती कमी असते. मात्र, विज्ञान शाखेच्या वर्गात बऱ्यापैकी विद्यार्थी उपस्थित असतात. त्यांना प्रात्यक्षिकांचा भाग महत्त्वाचा असतो. त्यासाठी स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि सोशल डिस्टन्सिंग, वर्गातील बैठक व्यवस्था यांचे फ्राधअन्यक्रम बदलतील
परदेशी शिक्षण घेण्याला आळा
आपल्या देशातील विद्यार्थी परदेशात न जाता भारतातच शिक्षण घेतील. त्यांच्यासाठी द्रशात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करावे लागतील. दूरशिक्षण अभ्यासक्रमकडे कल वाढणार आहे. दूरशिक्षण अभ्यासक्रमातून शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होणारआहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यापूर्वीच ऑनलाईन शिक्षणपद्धत सुरू केली आहे. आता करोनानंतर या प्रक्रियेला गती देण्यात येईल. यापुढे देश-विदेशातील अभ्यासक्रमही ऑनलाईनद्वारे विद्यार्थ्यांना पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यापुढे ऑनलाईन कोर्सेस, इ-कंटेन्टवर अधिक भर द्यावा लागेल.
– डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू