सिमेंट रस्त्यावरील दोन लेनमधील मोकळ्या पोकळीमुळे दुचाकीस्वारांचे अपघात
– कल्याणी फडके
पुणे – दीर्घकाळ टिकावे या उद्देशाने शहरातील बहुतांश रस्ते सिमेंटचे केले आहेत. डांबरी रस्त्यांच्या तुलनेत सिमेंट (क्रॉंक्रीट) रस्त्यांचे आयुर्मान जास्त असते. मात्र, हे “त्रुटीयुक्त’ ते रस्ते दुचाकी चालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. परिणामी पालिकेकडून रस्त्यांच्या “लाइफ’कडे लक्ष देत असताना वाहनचालकांच्या लाइफकडे मात्र डोळेझाक होत आहे.
सिमेंट रस्त्यांना असणारी पोकळ जागा (मध्यभागी किंवा कडेला असणाऱ्या रेषा) दुचाकीस्वारांच्या जीवावर बेतत आहेत. विविध अपघातांमध्ये वाहनचालकांच्या चुकांच्या बरोबरीने रस्ते जबाबदार ठरत आहेत. गुळगुळीत आणि लेव्हलिंग नसणारे सिमेंटचे रस्ते, दोन लेनमधील पोकळ जागा, खड्डे आदी प्राणांतिक अपघातांच्या संख्येत भर घालत आहेत. याविषयी महापालिका मात्र उदासीन आहे. “तुलनेने कमी देखभाल दुरुस्ती’ या एकाच शीर्षाखाली अगदी गल्लीबोळात हे रस्ते केले आहेत.
स्क्रॅबिंगची निविदा फक्त महामार्गासाठीच
सिमेंटचे रस्ते गुळगुळीत झाल्यानंतर वाहने घसरू नयेत, यासाठी ते खरबरीत करण्यात येतात. महामार्गासाठी याबाबतच्या दोन निविदा काढल्या आहेत. त्यापैकी एक निविदा मंजूर झाली असून, एकाचे काम सुरू आहे, अशी माहिती पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
असा होऊ शकतो अपघात
सिमेंट रस्त्याच्या कडेला “पेव्हर ब्लॉक्स’ बसवले आहेत. वाहनचालक एका लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये येताना दोन लेनमधील मोकळ्या पोकळीमध्ये गाडीचे मागचे चाक घसरते. यामुळे समतोल बिघडल्याने अपघात होऊन गंभीर दुखापतीसह जीवित हानी होण्याची शक्यता असते.
याही प्राणांतिक अपघातांमध्ये पोलिसांनी घेतली “असमान’ रस्त्याची नोंद
नोव्हेंबर 2019 मध्ये कात्रज उद्यानासमोर झालेल्या अपघातामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला होता. रस्त्याच्या त्रुटीमुळे संबंधित तरुणीचे वाहनावरील नियंत्रणे सुटले. परिणामी पाठीमागून येत असणाऱ्या टेम्पोच्या धडकेने तिचा मृत्यू झाला.
जानेवारी 2020 रोजी (मागील आठवड्यात) बंडगार्डन रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये तरुणीचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये संबंधित रस्ता असमान असल्याचे चित्र आहे.
असा येतो खर्च
डांबरी रस्ता – 3000 रुपये प्रति चौरस मीटर
सिमेंट रस्ता – 5000 रुपये प्रति चौरस मीटर
शहरामधील सर्वच रस्ते कॉंक्रीटचे करणे योग्य आणि गरजेचे नाही. आर्थिकदृष्ट्या विचार केल्यास याचा खर्च अधिक आहे. तर पर्यावरणाच्या दृष्टीनेदेखील हे रस्ते घातक आहेत. सिमेंट रस्ते करताना दोन ब्लॉक्सच्यामध्ये असणारी पोकळ जागा योग्य पद्धतीने भरणे आवश्यक आहे. याकडे मात्र दुर्लक्ष होते.
– प्रांजली देशपांडे, शाश्वत वाहतूक अभ्यासक
सिमेंट रस्ते पर्यावरणाच्या दृष्टीने घातक ठरत आहेत. या रस्त्यांमुळे मुख्यत्वे पाणी झिरपू शकत नाही. त्यामुळे सरसकट सिमेंटचे रस्ते करणे घातक आहे. अनेकदा रस्त्यांचे आयुर्मान जास्त असल्याचा दावा केला जातो. मात्र, याबाबत अद्याप तुलनात्मक कोणतीही ठोस कारणे सिद्ध झाली नाहीत. रस्ते तयार करताना गुणवत्तापूर्ण काम होणे गरजेचे आहे.
– अदिती देवधर, पर्यावरण अभ्यासक
सिमेंट रस्त्यावर असणाऱ्या पोकळ जागेला “एक्स्पांशन जॉईन्ट’ म्हणतात. त्याला पॉलिश करणे आणि पोकळी भरणे आवश्यक असते. डांबरी रस्त्याचे आयुर्मान सुमारे तीन वर्षे असते. या रस्त्याला अधिक देखभाल करावी लागत नाही. नागरिकांकडून माहिती मिळाल्यास मनपाकडून पाहणी करून कारवाई करण्यात येईल.
– अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख, पुणे महापालिका Life-threatening ‘path’ of cement roads