शहरात नॉयलॉन मांजा विक्रीसाठी दाखल : प्रशासन मूग गिळून गप्प
पिंपरी – न्यायालयाने नॉयलॉन मांजावर बंदी घातलेली असतानाही पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठेमध्ये मांजाची खुलेआम विक्री होत असून, प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. जीवघेण्या मांजाने आतापर्यंत अनेकांना जखमी केलेले आहे. तर काहींचा जीवदेखील घेतला आहे. अशा घटना शहरात घडल्या आहेत. तरीही विक्री होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
मकरसंक्रांत काही दिवसांवर आलेली आहे. बाजारपेठेत सणाच्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. मकरसंक्रांतीला महाराष्ट्रातील काही भागांत पतंग उडविण्याची प्रथा आहे. त्यामुळे, सध्या पतंग उडविण्यासाठी आवश्यक असलेल्या मांजाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सध्या बाजारपेठेमध्ये मांजाबरोबरच बंदी असलेला चिनी मांजाही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाला असून, त्याची विक्रीही राजरोसपणे सुरू आहे.
बंदी घातलेल्या मांजाच्या विक्रीसाठी अव्वाच्या-सव्वा भाव आकारले जात आहेत. नायलॉनच्या मांजामुळे पशुपक्षी, पर्यावरणास मोठी हानी होत आहे. अनेक वेळा नायलॉन मांजामुळे अपघात झालेले आहेत. पक्ष्यांना जखमी केले आहे. काहींना आपल्या प्राणाला मुकावे लागले. अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे नायलॉनचा मांजानिर्मिती, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, मागील दोन वर्षांपासून ही बंदी कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. शहरातील पिंपरी कॅम्प, आकुर्डी, दापोडी, काळेवाडी आदी परिसरात अनेक छोट्या मोठ्या दुकानांत मांजाची खुलेआम विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे लहान मुलांनाही सर्रासपणे हा मांजा विकला जात आहे. चिनी मांजा सहज उपलब्ध होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गतवर्षी अनेक जण जखमी
नॉयलॉन मांजाच्या वापरामुळे मागील वर्षी नाशिक फाटा येथील जेआरडी टाटा उड्डाणपुलावर मांजा गळ्याभोवती गुंडाळल्याने झालेल्या अपघातामध्ये एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाला होता. तर इतर छोट्या मोठ्या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. असे असतानाही नायलॉनचा मांजा विक्रीसाठी दाखल झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
मांजाचे दर
साधा मांजा : 12 रुपये
नॅयलॉन मांजा : 100 रुपये रिळ
चिनी मांजा : 150 रुपये रिळ
चिनी मांजाची विक्री आणि वापरावर बंदी घातलेली असताना शहरातील किरकोळ दुकानातही सहजपणे चिनी मांजा उपलब्ध होत आहे. उघडपणे विक्री होत असताना प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसेल तर चिनी मांजावर बंदी घालून तरी काय फायदा? त्यामुळे, अशाप्रकारे चिनी मांजाची विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी.
– जीवन कांबळे, युवक