कामशेत – कान्हे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात कावळे चोच मारत असलेल्या एका दुर्मीळ जातीच्या शृंगी घुबडास पकडून व रात्रीच्या वेळी सोडून देऊन वन्यजीवरक्षक टीमने जीवदान दिले आहे.
रविवारी दुपारच्या वेळेस कान्हे गावातील ग्रामीण रुग्णालयाच्या मागच्या पटांगणात एका घुबडाला काही कावळे चोच मारत मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे अनिकेत सातकर यांनी पाहिले. त्यानंतर वन्यजीवरक्षक मावळ टीमचे सदस्य तुषार सातकर यांना माहिती दिली.
तुषारबरोबर ऋषी सातकर, प्रमोद ओव्हाळ, यश बच्चे यांनीही घटनास्थळी धाव घेत सदर घुबडाची कावळ्यांपासून सुटका करून ते घुबड ताब्यात घेतले व हे शृंगी जातीचे घुबड असल्याचे निदर्शनास आले. सदर घुबड अशक्त असल्याने पक्षीप्रेमींनी घुबडावर प्राथमिक उपचार करून रात्रीच्या वेळी आठच्या सुमारास त्यास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.