वॉशिंग्टन – जर मंगळावर कधी काळी जीवसृष्टी अस्तित्वात असतीच तर ती पृष्ठभागाखाली काही मैल खोलवर अस्तित्वात असावी. भूगर्भीय उष्णतेमुळे बर्फाचे जाड थर देखील वितळत असल्यामुळे ही शक्यता नाकारता येऊ शकत नाही, असे एका अभ्यासामध्ये म्हटले आहे. “सायन्स ऍडव्हान्सेस’ या विज्ञान विषयक नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
मंगळावर 4.1 अब्ज ते 3.7 अब्ज वर्षांपूर्वी भूगर्भीय उष्णतेमुळे काही आपत्ती निर्माण झालेल्या असाव्यात का, हे जाणून घेण्यासाठी हे संशोधन केले गेले. पृष्ठभाग वितळू शकेल एवढे भूपृष्ठाखालील तापमान मंगळावर सर्वच ठिकाणी असावे, असा निष्कर्श या संशोधनातून काढला गेला आहे.
4 अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर जरी दमट हवामान असले तरी चुंबकीय शक्तीच्या अनुपस्थितीमुळे आणि तापमान खूप कमी झाल्यावर अतिखोलवरील पाणी स्थिर राहू शकले असावे. या पाण्यात भूपृष्ठाखाली उष्णता असल्याने जीवसृष्टी निर्माण होऊ शकली असेल, असे अमेरिकेतील रुटजर्स युनिव्हर्सिटी-न्यू ब्रन्सविकचे सहाय्यक प्राध्यापक लुजेंद्र ओझा यांनी म्हटले आहे.