याला जीवन ऐसे नाव…

उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत असताना वर्तमानपत्रात अगदी परस्परविरोधी बातम्या वाचल्या आणि मी अस्वस्थ झाले. एका दूरच्या गावात 10 दिवसांनी एकदा पाणी मिळणार. त्या बातमी बरोबर आटलेल्या नद्या, विहीरींची चित्रे होती तर एका शहरात पाईप लाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेल्याची बातमी व पाणी वाहत असल्याचे चित्र.

उन्हाळ्याच्या काळात पाण्याची टंचाई हे नित्याचेच आहे. आपण शहरवासियांना याची फारशी कल्पना येत नाही. नळ सोडला की पाणी येते, हे आपल्याला माहिती आहे. पण कित्येक गावांत, विशेष करून दुष्काळी भागात, हंडे, पिंपे भरून नेणाऱ्या स्त्रिया व माणसे पाहिली की आतल्या आत कुठेतरी अस्वस्थ व्हायला होते.

पाणी-नीर, जल, तोय आणि जीवनही… खरंच जीवनाला अतिशय आवश्‍यक आहे पाणी. म्हणून त्याला जीवनही म्हणतात. खरं तर एखादे दिवस जेवायला न मिळाले तर माणूस राहू शकतो तस घडतंही प्रत्येकाच्या बाबतीत कधीतरी. पण आठवून पाहा पाणी न पिता किती वेळ राहू शकाल. नाही ना! म्हणूनच हे पाणी आपण जपून वापरायला शिकलं पाहिजे.

अनेकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. हे लक्षात घेता घरातले नळ सोडून बदाबद पाणी वापरताना त्या लोकांची आठवण ठेवायला पाहिजे. तोंड धुताना, दाढी करताना कपडे, भांडी धुताना नळ सोडून ठेवून पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. गाड्या धुण्यासाठी किंवा घरातील कालचे भरलेले पाणी ओतून देताना काळजी घ्यावी. ते पाणी आज वापरायला काहीच हरकत नसते.

शाळा, कॉलेजेसमधून मुलांवर यासाठी प्रबोधने ठेवली जावीत. अगदी लहान मुलांना देखील वॉटर बॉटल मधील उरलेले पाणी एखाद्या झाडाला घालावे असे सांगतात. हॉटेलमध्ये ही पाणी देताना जेवढे आवश्‍यक आहे तेवढेच पाणी वापरावे व पाण्याचा अपव्यय टाळावा. सार्वजनिक ठिकाणी कुठेही नळ सुटा राहिल्यास पाणी वाया जात असेल तर ते नळ बंद करून टाकावे. पर्यावरणासाठी झाडे लावणे गरजेचे आहे. झाडांना योग्य तेवढे पाणी घालून त्याचे संवर्धन करावे.

हल्ली बऱ्याच ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करतात. ते खूपच चांगले आहे.पावसाचे पाणीही वाया घालवू नका. तसेच काही नवीन इमारतीतून पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी ही योजना असतात. जेणे करून पाणी वाया न जाता त्याच्या प्रत्येक थेंबाचा सदुपयोग होईल.

पाणी तरी किती प्रकारचे असते बघा. आपण देवाची करणी आणि नारळात पाणी म्हणतो. खरंच नारळातील पाणी किती मधुर असते.तर अथांग आणि दूरवर पसरलेल्या सागरातील एक घोटही पाणी आपण पिऊ शकत नाही. इतके ते खारट असते. अतिशय दु:खाने किंवा एखाद्या आघाताने डोळ्यात येणारे पाणी म्हणजे दु:खाश्रु असतात तर आनंदाने डोळ्यात येणारे पाणी आनंदाश्रू असतात. गटारातून वाहणारे पाणी दुर्गंधी युक्‍त असते. तर देवळात देवाच्या पायावरून येणारे पाणी आपण तीर्थ म्हणून प्राशन करतो. आपल्या शरीरातून बाहेर पडणारे पाणी देखील दुर्गंधी युक्‍त असले तरी त्यात बिघाड झाल्यास तोंडचे पाणी पळते. आवडता पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटते ते पाणी वेगळेच.

तर असे हे पाणी खरोखरीच “जीवन’ हे त्याचे नाव सार्थ करते. तेव्हा “पाणी वाचवा’ हे तर नक्कीच. नाहीतर हे पाणीच आपल्या तोंडचे पाणी पळवील आणि डोळ्यातून वाहायला सुद्धा पाणी राहणार नाही!

– आरती मोने

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)