जाणून घ्या शीतल आमटे यांचा ‘जीवनप्रवास’

पुणे – डॉक्‍टर विकास आमटे यांच्या कन्या व महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे.

डॉक्‍टरीसेवा करत असतानाच सोशल आंत्रप्रनरशिप अभ्यासक्रम पूर्ण करून हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचे वित्त नियोजन करणे असो की आनंदवनला “स्मार्ट व्हिलेज’ बनवणे असो, अपंगांसाठी “निजबल’ आणि बेरोजगार युवकांसाठी “युवाग्राम’ उपक्रम राबवणे यासारख्या अनेक उपक्रमात त्यांनी आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवला होता.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा यंग ग्लोबल लीडर पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
ग्रामीण संस्कृतीचे रक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळून तरुणाईचे शहराकडे पलायन थांबवणे, हा ध्यास घेतलेल्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांना आनंदवनला “स्मार्ट व्हिलेज’ बनवायचे होते. तांत्रिक, आर्थिक, सामाजिकदृष्टया खेडयांनाच सक्षम करणारा हा उपक्रम त्यांनी राबवला. यामध्ये सौर ऊर्जा, हेल्थ एटीएम, उपक्रमशीलतेला शीतल यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या स्मार्ट व्हिलेजमध्ये विशेष स्थान होते.

त्याचबरोबर अपंगांसाठी निजबल, बेरोजगार तरुणांसाठी युवाग्राम या प्रकल्पाबरोबरच मियावाकी पद्धतीने चार जंगले वसवत पर्यावरण रक्षणाचाही विडा शितल यांनी उचलला होता. त्या आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

आजोबा बाबा आमटे, आईवडील विकास-भारती आमटे यांच्यासह संपूर्ण आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्याच्या दृष्टीने डॉ. शीतल यांनी 2003 मध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण घेतले.

पुढे अमेरिकेत जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून लीडरशिपचा कोर्सही शीतल यांनी पूर्ण केला. मेडिकल लीडरशिप क्षेत्रात लॅन्सेट कमिशन ऑन ग्लोबल सर्जरी सोबत मशाल आणि चिराग असे दोन कार्यक्रम सुरू केले. समाजात काम करण्यास उत्सुक डॉक्‍टरांना लीडरशिप क्षेत्रात अधिक सक्षम बनविले जाते. दरवर्षी यातून सुमारे 50 डॉक्‍टर सक्षम बनवण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते.

आमटे कुटुंबाचं महाराष्ट्रातील योगदान नव्यानं सांगण्याची गरज नाही. त्यांचा वारसा लाभलेल्या डॉ. शीतल यांनी स्वप्रयत्नांतून स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.