गरोदर पत्नीचा जाळून खून करणाऱ्याला जन्मठेप

माहेरहून दुचाकी घेण्यासाठी पैसे आणण्यासाठी केले हे कृत्य

पुणे – दुचाकी घेण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत, यासाठी गरोदर पत्नीचा जाळून खून करणाऱ्या पतीला जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

सुदर्शन नारायण मेंगडे (वय 25, रा. ससाणे वस्ती, महंमदवाडी, हडपसर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने पत्नी शीतल यांचा खून केला. शीतल यांनीच मृत्यूपूर्व वानवडी पोलिसात फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी काम पाहिले. त्यांनी नऊ साक्षीदार तपासले. सहायक पोलीस निरीक्षक डी.व्ही.ठाकुर यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना सहायक पोलीस निरीक्षक आंभोरे, पैरवी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक लोखंडे, पोलीस शिपाई पंढरीनाथ पवार यांनी मदत केली. ही घटना 5 सप्टेंबर रोजी रात्री 12.15 च्या सुमारास घडली होती.

सुदर्शन याने दुचाकी घेण्यासाठी, खर्चासाठी माहेरहून पैसे यावेत. तसेच माहेरी जायचे नाही, या कारणावरून फिर्यादीच्या साडीवर, अंगावर रॉकेल ओतले. त्यानंतर आग लावून त्यांना पेटवून दिले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा आणि पोटातील अर्भकाचा मृत्यू झाला. वानवडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास दोषारोपपत्र दाखल केले. पत्नी गरोदर आहे, हे माहित असतानाही त्याने त्यांचा अमानुष छळ केला आहे. पैशासाठी त्यांना त्रास झाला आहे. त्यांच्या या कृत्याने दोघांची हत्या झाली आहे. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. पुष्कर सप्रे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.