पुणे – तीन वर्षांच्या पोटच्या मुलालाच विषारी औषध पाजून खून करणाऱ्या आईला न्यायालयाने जन्मठेप आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा आदेश दिला. कौटुंबिक वादाच्या कारणातून त्या महिलेने मुलाला विषारी औषध पाजले. त्यानंतर आईनेदेखील औषध घेतले आणि गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला होता. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे त्या महिलेला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील ऍड. लीना पाठक यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने हा निकाल दिला.
स्वाती विक्रम माळवदकर (वय 25, रा. तळवडे) असे शिक्षा सुनावलेल्या महिलेचे नाव आहे. तळवडे येथे 2 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी आकराच्या सुमारास हा प्रकार घडला होता. याबाबत स्वाती यांचे दीर श्रीकांत माळवदकर (वय 30) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार स्वाती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेच्या एक वर्ष आधी फिर्यादी व त्यांचा भाऊ विक्रम आणि आई-वडील असे सर्व एकत्र राहात होते. मात्र, स्वातीला ते मान्य नसल्याने तिचे सासू-सासरे गावी राहू लागले होते. परंतु सर्वांची एकत्र राहावे, अशी विक्रम यांची इच्छा होती. त्यामुळे विक्रम आणि स्वाती यांच्यात वाद झाले होते. घटनेच्या दिवशी स्वाती हिने विक्रम यांचा फोन उचलला नाही. त्यामुळे विक्रम यांनी फिर्यादी यांना घरी जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांना पुतण्या निशिगंध अंथरुणात झोपलेला दिसला. तर त्यांची वहिनी स्वाती ही घरात बेशुद्ध पडलेली होती व पंख्याला साडी बांधलेली होती. त्यामुळे फिर्यादी त्यांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी पुतण्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर स्वातीला काही दिवस
उपचार केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता.