सातारा (प्रतिनिधी) – फलटण तालुक्यातील सोनगाव बंगला येथील बाबासाहेब केशव भोसले यांचा खून करून या घटनेच्या साक्षीदाराचे घर पेटवून दिल्याप्रकरणी अंकुश दाजी चव्हाण (वय 60, रा. सोनगाव बंगला, ता. फलटण) याला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या खटल्याची सुनावणी सातारा येथील अतिरिक्त विशेष न्यायाधीश (चौथे) एस. जी. हिरेमठ यांच्यासमोर झाली.
याबाबत माहिती अशी, फलटण तालुक्यातील सोनगाव बंगला येथे यादव व साबळे यांच्या दुकानासमोरच्या बाकड्यावर बाबासाहे केशव भोसले हे दि. 16 सप्टेंबर 2015 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बसले होते. त्यावेळी अंकुश चव्हाण याने पाठीमागून येऊन भोसले यांच्या अंगावर कॅनमधील रॉकेल ओतले आणि हातातील काडीपेटीने त्यांना पेटवून दिले.
यात भोसले हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना भोसले यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे साक्षीदार देवेंद्र राजेंद्र पाटोळे (रा. सोनगाव बंगला) यांचे घर अंकुश चव्हाणने पेटवून दिले होते.
याप्रकरणी अंकुश चव्हाण याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी सातारा येथील अतिरिक्त विशेष न्यायाधीश (चौथे) एस. जी. हिरेमठ यांच्यासमोर झाली. या खटल्याचा निकाल मंगळवारी लागला. त्यामध्ये आरोपी अंकुश चव्हाण याला जन्मठेप, पाच हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास पाच महिने सक्तमजुरी, अशी शिक्षा सुनावण्यात आली.
या खटल्यात सहाय्यक सरकारी वकील लक्ष्मणराव खाडे यांनी सरकारच्यावतीने काम पाहिले. त्यांना फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी कर्मचारी मुस्ताक शेख यांनी सहकार्य केले. प्रॉसिक्युशन अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, शिवाजी घोरपडे यांनी काम पाहिले. त्यांना प्रॉसिक्युशन स्कॉडच्या अंमलदार उमा घारगे, हवालदार शेख, कांचन बेंद्रे, अजय शिंदे, कुंभार, घोरपडे, अमित भरते यांनी सहकार्य केले.