नवी दिल्ली – काश्मिरातील फुटिरतावादी नेता आणि जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेचा प्रमुख यासिन मलिक याला दिल्लीतील न्यायालयाने “टेरर फंडिंग’च्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबरोबर, टेरर फंडिंग, बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या विविध तरतूदींखाली यासिन मलिक याला यापूर्वीच दोषी ठरवण्यात आले होते. तसेच दंडाची रक्कम निश्चित करण्यासाठी यासिन मलिकच्या मालमत्तेची सविस्तर माहिती सादर करावी, असे निर्देशही न्यायालयाने 19 मे रोजी “एनआयए’ला दिले होते.
या आरोपात त्याला देहदंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी “एनआयए’ने न्यायालयाकडे केली होती.
यासिन मलिकने 10 मे रोजी न्यायालयात दिलेल्या निवेदनात आपल्यावरील कोणत्याही आरोपांचे खंडन करणार नसल्याचे म्हटले होते. त्याच्यावर दहशतवादी कारवाया, दहशतवादी कारवायांसाठी निधी संकलन, बेकायदेशीर कृत्ये, दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी असणे आणि देशद्रोहाचे आरोप ठेवण्यात आले होते. त्याला वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवतानाच न्यायालयाने यासिन मलिकला 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
दरम्यान, फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटे, शब्बीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मो. अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, जहूर अहमद शाह वताली, शाबीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवलकिशोर कपूर यांच्यासह काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर औपचारिकपणे आरोप निश्चित केले.