पुणे – लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी सोमवारी (दि. 1 फेब्रुवारी) पुण्यातील दक्षिण मुख्यालयाचा कार्यभार स्वीकारला. राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हुतात्मा सैनिकांच्या स्मृतीला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर दक्षिण कमांड मुख्यालयात नवीन प्रमुखांना लष्करी जवानांनी मानवंदना दिली.
लेफ्टनंट जनरल नैन हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी कुंजपुरा सैनिक शाळेत शालेय शिक्षण पूर्ण केले. जून 1983 मध्ये त्यांची डोगरा रेजिमेंटमध्ये नेमणूक झाली. आतापर्यंतच्या विशिष्ट सैनिकी नेमणूकांमुळे अनेक मोहिमांचा अनुभव त्यांना आहे. जम्मू काश्मिरमध्ये नियंत्रण रेषेजवळ त्यांनी आपल्या बटालियनचे नेतृत्व केले.
तसेच, दक्षिण मुख्यालयातील स्ट्राईक कॉर्पस, इशान्येकडील माउंटन ब्रिगेड, उत्तर काश्मिरमध्ये नियंत्रण रेषेवर ताबा राखण्याचे काम करणारी इन्फन्ट्री डिविजन व पश्चिम आघाडीवरील धोरणात्मक महत्त्व असलेल्या तुकडीचे नेतृत्वही त्यांनी केले आहे.
ते संयुक्त राष्ट्र संघाच्या इराक व कुवैतमधील मिशनचे निरीक्षकही होते. त्यांनी जम्मू काश्मीर, पाकिस्तान, चीन, बांग्लादेश यावर विस्तृत अभ्यास व संशोधन केल्यामुळे ते त्या प्रदेशावरील विशेष तज्ज्ञ मानले जातात. लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन व त्यांच्या पत्नी अनिता नैन, विभागीय आर्मी वाईफ असोसिएशनच्या प्रमुख आहेत.