‘लिची आणि बालकांच्या तापाच्या संबंधांची चौकशी करा’

लोकसभेत राजीवप्रताप रुडींची मागणी

नवी दिल्ली: बिहार मध्ये एक्‍युट एन्साफलाटिस सिंड्रोम नावाच्या तापाने अनेक बालकांचा मृत्यू झाला असून अनेक बालके अजूनही तेथे मृत्युशी झुंज देत आहेत. तो विषय आज लोकसभेत आणि राज्यसभेतही चर्चीला गेला. बिहारमध्ये लिची नावाचे फळ मोठ्या प्रमाणात उत्पादीत होते. हे फळ खाल्ल्यामुळेच बालकांवर हा विपरीत परिणाम होत असल्याचा संबंध जोडला जात आहे, यातून लिची हे बिहारचे महत्वाचे फलोत्पादन बदनाम होत असून या आरोपाची चौकशी करावी अशी मागणी भाजपचे बिहारचे लोकसभा सदस्य राजीवप्रताप रूडी यांनी आज लोकसभेत केली.

या रोगाचा फैलाव मुज्जफरपुर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाला आहे. तेथील लिचीच्या फळातून हा प्रकार होत असल्याचा जो आरोप केला जात आहे त्या मागे लिची या फळाचीच बदनामी करण्याचा डाव आहे काय असा प्रश्‍न त्यांनी लोकसभेत उपस्थित केला. ते म्हणाले की आम्ही लहानपणापासून लिचीचे फळ खात आहोत पण आम्हाला मात्र त्याचा कोणताही बाधा झालेली नाही असे त्यांनी म्हटले आहे. लिचीविषयी परसलेल्या गैरसमजामुळे अनेकांनी लिची खाणे किंवा त्याचा ज्युस पिणे सोडून दिले आहे असे ते म्हणाले. लिचीचे फलोत्पादन करणारे शेतकरीही त्यामुळे नाहक अडचणीत आले आहेत. त्यामुळे या अपप्रचाराचे नेमके कारण शोधण्याची गरज आहे सरकारने त्या अनुषंगाने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान प्रख्यात बालरोग तज्ज्ञ अरूण शहा यांनी म्हटले आहे की कच्ची लिची खाल्यामुळे त्यातील जो विषारी पदार्थ असतो त्याची बालकांना बाधा होऊ शकते. तथापी अन्य वैद्यकीय तज्ज्ञांचे मात्र यावर भिन्न मत आहे. दरम्यान बिहार मधील मुलांच्या या आजाराकडे राज्य व केंद्र सरकारने अत्यंत बेफिकीरी दाखवली असल्याचा आरोप कॉंग्रेसचे लोकसभेतील सभागृह नेते अधिर रंजन चौधरी यांनी केला. ते म्हणाले बिहारमध्ये डॉक्‍टरांची उपलब्धता आणि वैद्यकीय सेवेची उपलब्धता अत्यंत अपुरी असल्याने बालकांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत त्यामुळेही मोठ्या प्रमाणात बालके दगावली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.