हस्तांतरीत पथारी परवाने पालिका अधिकृत करणार

31 जानेवारी पर्यंत अखेरची मुदत; अतिक्रमण विभागाकडून स्पष्ट

 

पुणे – महापालिकेने मान्यता दिलेल्या अधिकृत पथारी व्यावसायिकांकडून 2014 पूर्वी हस्तांतरीत करून घेण्यात आलेले पथारी परवाने महापालिकेकडून अधिकृत करण्यात येणार आहेत. हे परवाने हस्तांतरीत केल्यानंतर अनेकांनी त्यासाठीचे आवश्‍यक शुल्क तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्‍यक होते.

मात्र, अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हे परवाने अधिकृत करण्यात येणार असून त्यासाठीची अंतिम मुदत 31 जानेवारी निश्‍चित केली आहे. त्यानंतरही परवाने नुतनीकरण न करून घेतल्यास असे परवाने रद्द केले जाणार असल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

महापालिकेकडून शहरात 2014 पासून शहर फेरीवाला धोरण राबविण्यात येत आहे. त्यानुसार, प्रत्येक परवानाधारकाने संगणकीय नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे. या धोरणापूर्वी पालिकेकडून 1989 मध्ये सुमारे 7 हजार 792 जणांना पथारी परवाने देण्यात आले होते. त्यातील अनेकांनी आपले परवाने वारसा हक्‍काने, अथवा इतरांना हस्तांतरीत केले असून विक्रीही केलेले आहेत.

मात्र, यानंतर हे परवाने घेणाऱ्यांनी 2014 च्या धोरणानुसार, हस्तांतरणासाठी आवश्‍यक असलेले सेवा शुल्क भरून परवाने आपल्या नावावर हस्तांतरीत करून घेणे अपेक्षित आहे. मात्र, अनेकांनी या प्रक्रियेला छेद देत परस्पर परवान्यांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे, या परवानाधारकांनी 31 जानेवारीपूर्वी ते अधिकृत करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्यानंतरही जे व्यावसायिक हे परवाने तडजोड शुल्क भरून अधिकृत करून घेणार नाहीत. त्यांचे परवाने रद्द करून संबंधितांच्या व्यवसायाची साधणे जप्त करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.