सातारा – लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी परवाने देण्याची सुविधा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे. वाहतूकदारांनी सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवावेत. अर्जांची शहानिशा करून अशा परवान्यांच्या स्कॅन कॉपीज् ई-मेलद्वारे संबंधितांना पाठविण्यात येतील, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली.
राज्य शासनाच्या मुख्य सचिवांनी दि. 25 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वाहतूक सेवा (हवाई/लोहमार्ग/रस्ते) स्थगित केल्या आहेत. त्यातून जीवनावश्यक, महत्त्वाच्या मालवाहतुकीस आणि अग्निशमन, कायदा-सुव्यवस्था व आणीबाणीच्या सेवा या वाहतुकीस सूट जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या आस्थापनांनी अशा मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांवर स्टीकर्स बसवावेत. या स्टीकरवर वाहतुकीच्या उद्देशाचा मजकूर स्पष्ट दिसेल, अशा पद्धतीने प्रदर्शित करावा. त्यामुळे तो अंमलबजावणी यंत्रणेच्या सहज निदर्शनास येईल.