नवी दिल्ली – भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे एलआयसीचा आयपीओ लवकरच निघणार असून या कंपनीची शेअर बाजारावर मार्च अखेरीस नोंदणी केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण सरकारी अधिकाऱ्यांने दिले.
आयपीओ जारी करण्यासाठी आवश्यक ती परवानगी मागण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव अंतिम टप्प्यात आली असून लवकरच ही कागदपत्रे बाजार नियंत्रक सेबीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. एलआयसीची निर्गुंतवणुकीची आकडेवारी 1 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात येणार आहे. कारण हा आयपीओ 31 मार्चपूर्वी बाजारात आणला जाणार आहे.
सरलेल्या वर्षात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये निर्गुंतवणुकीचे जे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते ते पूर्ण करण्यासाठी एलआयसीच्या आयपीओची मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. या वर्षांमध्ये निर्गुंतणुकीच्या माध्यमातून 1.75 लाख कोटी रुपये जमा करण्याचे ठरविण्यात आले होते.
मात्र आतापर्यंत प्रत्यक्षात 9,330 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. एलआसीने नुकताच पहिल्या सहा महिन्याचा ताळेबंद जाहीर केला आहे. हा ताळेबंद देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांना गुंतवणुकी संदर्भात निर्णय घेण्यास उपयोगी ठरणार असल्याचे दिसून येते.