न्यूयॉर्क – ग्रंथालयातून पुस्तक घरी वाचण्यासाठी घेऊन जाणे हे वाचन पूर्ण झाल्यावर पुस्तक ग्रंथालयाला परत करणे ही एक सर्वसाधारण प्रक्रिया मानली जाते. वाचनास विलंब लागला तर पुस्तक परत करण्यास काही कालावधी लागू शकतो, पण एका ग्रंथालयामध्ये वाचण्यासाठी नेलेले पुस्तक तब्बल 100 वर्षांनी परत करण्यात आल्याची घटना घडली आहे.
सेंट हेलेना पब्लिक लायब्ररी संदर्भात ही घटना घडली असून जिम पेरी नावाच्या इसमाने घरात सापडलेले एक पुस्तक या ग्रंथालयात जमा केले तेव्हा हे पुस्तक सुमारे 100 वर्षांपूर्वी वाचण्यासाठी बाहेर गेले असल्याची नोंद तेथे आढळून आली.
जिम पेरीच्या आजोबांनी ते पुस्तक वाचण्यासाठी नेले होते जिमने आपल्या घराची साफसफाई काढली असता त्याला त्यात ते पुस्तक आढळले हे पुस्तक दुर्मीळ असल्याचे समजून त्याने सेंट हेलेना लायब्ररीला दिले. त्याच्या आजोबांनी ते शंभर वर्षांपूर्वी वाचण्यासाठी घरी आणले होते. प्रख्यात इतिहासकार बेनसन लॉसिंग यांनी लिहिलेले फॅमिली हिस्टरी ऑफ युनायटेड स्टेट्स हे ते पुस्तक होते.
पुस्तक 100 वर्षापेक्षा जास्त कालावधी पूर्वी या लायब्ररीने खरेदी केले होते. ग्रंथालयाचे संचालक चार्लस क्रीडेल यांनीसुद्धा या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली असून यापूर्वी दोन ते तीन वर्षांनी पुस्तके परत करण्याच्या घटना घडल्या आहेत; पण शंभर वर्षांनंतर पुस्तक परत होण्याची ही पहिलीच घटना आहे असे त्यांनी म्हटले आहे.
पुस्तक जेव्हा संचालकांच्या टेबलवर आले तेव्हा ते अतिशय जीर्ण अवस्थेत होते संचालक क्रीडेल यांनी या पुस्तकाचे शेवटचे पान उलटले तेव्हा त्या पानावर एक शिक्का होता ज्या शिक्यावर पुस्तक परत करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 1927 ही होती. त्या वाचकाच्या नातवाने 10 मे 2023 रोजी हे पुस्तक ग्रंथालयात परत केले.