डॉ. संजीव सोनवणे यांचे मत
पुणे(प्रतिनिधी) – ग्रंथालये खूप महत्वाची भूमिका बजावत आहेत. जास्तीत जास्त ऑनलाईन सेवा देताना ग्रंथपालांनी अचूक संदर्भ दिले पाहिजेत, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे यांनी व्यक्त केले. ग्रंथालये पुन्हा सुरू करताना ग्रंथपालांनी कोणत्या प्रकारचे उपाय केले पाहिजेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सेंट व्हिन्सेंट कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ई-सामग्री निर्मिती, संवर्धन आणि प्रसार या विषयावरील ग्रंथालय व्यावसायिकांसाठी दोन आठवड्यांचा ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. यात देशाच्या विविध राज्यातून 367 ग्रंथपालांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.
विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र कुंभार यांनी ई-सामग्री विकास आणि ऑनलाइन ग्रंथालय सेवांमध्ये ग्रंथालय कसे प्रभावी भूमिका बजावू शकते यावर मत मांडले. शेवटच्या सत्रात प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी यांनी आर्थिक मंदीमध्ये ग्रंथालये कशी महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात आणि प्रभावी ऑनलाइन सेवा पुरविण्यासाठी ग्रंथालयांची भूमिका देखील त्यांनी नमूद केली.
सेंट व्हिन्सेंट महाविद्यालयाचे संचालक डॉ. जीवेंद्र जाधव, प्राचार्य डॉ. अनिल अडसुळे, कार्यक्रम प्रभारी डॉ. सुनील शेटे, प्रा. फ्रॅंकलिन साळवी, प्रा. गिलबी जॉन, समन्वयक ग्रंथपाल प्रा. योगेश मते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.