पुणे -पालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांचे दैनंदिन काम शुक्रवारपासून नियमित होणार सुरू होणार आहे. या गावांसाठी महापालिकेने संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून हे अधिकारी सुरूवातीचे काही दिवस या कामकाजावर लक्ष ठेवणार आहेत.
ग्रामपंचायत असताना असलेले दैनंदिन कर्मचारी आणि शासनाच्या ग्रामसेवकांना विश्वासात घेऊन ही कामे नियमितपणे सुरू केली जाणार आहेत. त्यात दैनंदिन स्वच्छता, पाणीपुरवठा, दिवाबत्ती तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवांचा समावेश असणार आहे.
गुरुवारी सकाळीच महापालिकेने या गावांच्या हद्दीजवळील क्षेत्रीय कार्यालयांकडे जबाबदारी दिली आहे. त्यानुसार संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी या ग्रामपंचायतीचे बॅंक खाते, कर्मचाऱ्यांचे दैनंदिन हजेरी रजिस्टर तसेच मिळकतकर रजिस्टरसह कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
गावकऱ्यांच्या तक्रारी स्वीकारणार
आता या प्रत्येक गावासाठी स्वतंत्र संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यात उप आणि कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. नागरिकांच्या तक्रारी, अडचणी तसेच निवेदने हे अधिकारी स्वीकारणार असून ग्रामपंचायतीचे कर्मचारी दैनंदिन कामकाज या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली करणार आहेत.
तसेच या गावांसाठीची तातडीची तसेच आवश्यक कामे करण्याचा अहवाल हे अधिकारीच तयार करणार आहेत. सुरूवातीच्या टप्प्यात क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर ही कामे केली जाणार आहेत.