बीजिंग- चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे विश्वासू सहकारी ली कियांग यांची चीनच्या संसदेने देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. तीन वर्षे करोनाची साथ आणि पाश्चात्य देशांबरोबर ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभुमीवर ली कियांग यांना देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ली केगियांग हे जवळपास 10 वर्षे पंतप्रधानपदावर राहिल्यानंतर पायउतार झाले. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून 63 वर्षीय ली कियांग हे चीनचे पंतप्रधान बनले आहेत.
चीनमधील सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने मांडलेल्या प्रस्तावांना देशातील निर्णय घेणारी सर्वोच्च रचना असलेल्या “नॅशनल पीपल्स कॉंग्रेस’ने मंजूरी दिली. पंतप्रधानपदी ली कियांग यांच्या नावाची शिफारस स्वतः शी जिनपिंग यांनीच केली होती. त्यामुळे या शिफारसीला मंजूरी मिळणे अगदी स्वाभाविक होते.
मात्र शी जिनपिंग यांची अध्यक्षपदी निवड ज्या प्रमाणे एकमताने झाली, तशी ली कियांग यांची निवड एकमताने झाली नाही. “एनपीसी’च्या 2,947 सदस्यांपैकी 2,936 सदस्यांनी त्यांच्या नावाला मंजूरी दिली. मात्र 3 सदस्यांनी त्यांच्याविरोधात मतदान केले आणि 8 सदस्य अनुपस्थित राहिले.
ली केगियांग यांना निरोपाचे हस्तांदोलन…
मतदानानंतर जिनपिंग यांनी अध्यक्ष म्हणून ली कियांग यांच्या नियुक्तीच्या आदेशावर स्वाक्षरी केली. त्यानंतर त्यांनी आणि नंतर मावळते पंतप्रधान ली केगियांग यांनी ली कियांग यांचे अभिनंदन केले. मुख्य म्हणजे यानंतर लगेचच जिनपिंग यांनी ली केगियांग यांचे हात हातात घेऊन त्यांना धन्यवाद दिले.
“आता राजकारणातून निवृत्ती घ्या.’ हे सुचवणारे हे निरोपाचे हस्तांदोलन होते. ली केगियांग हे 2012 मध्ये शी जिनपिंग यांच्या बरोबर अध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार होते. मात्र त्यांना नंतर पंतप्रधानपदावर समाधान मानावे लागले होते. अध्यक्ष म्हणून शी जिनपिंग यांच्याकडून सातत्याने कामकाजात होणारा हस्तक्षेप, भ्रष्टाचाराविरोधात धडक कारवाई आणि लष्कराची सूत्रे हाती घेण्यामुळे नाराज झालेल्या ली केगियांग यांनी गेल्या वर्षीच निवृत्तीचे संकेत दिले होते.
ली कियांग जिनपिंग यांच्या मर्जीतील पंतप्रधान
ली कियांग हे जिनपिंग यांच्या मर्जीतील नेते आहेत. “सीपीसी’मध्ये आणि सरकारमध्ये ते जिनपिंग यांच्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते असणार आहेत. आतापर्यंत त्यांची ओळख उद्योग पूरक राजकीय नेते म्हणून आहे. उपाध्यक्ष म्हणून त्यांनी शी जिनपिंग यांच्या समवेत अगदी उमेदीच्या काळात काम केले आहे. खासगी उद्योगांबरोबर विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करून घेण्यात त्यांचे कौशल्य सर्वांना माहीती आहे.