बर्लिन – करोनाच्या सावटाखाली अखेर येथील मानाच्या बुंदेसलिगा फुटबॉल स्पर्धेला दिमाखात प्रारंभ झाला. अव्वल क्लब बायर्न म्युनिक संघाने स्टार खेळाडू रॉबर्ट लेवानोवस्कीच्या गोलच्या जोरावर हा सामना जिंकताना युनियन बर्लिन संघाचा 2-0 असा पराभव केला.
ही स्पर्धा सुरू होणार याचे संकेत काही दिवसांपूर्वीच मिळाले होते. मात्र, करोनाचा धोका समोर असताना प्रत्यक्ष सामने खेळवण्यात यश येणार का, हा प्रश्न विचारला जात होता. आयोजकांनी फुटबॉल प्रेक्षकांना मैदानापासून दूर ठेवत हा सामना खेळवला. लेवानोवस्कीने यंदाच्या मोसमातील आपला 26 वा गोल नोंदवला. त्यानंतर डिफेंडर बेंजामिन पावर्डने हेडरवर आणखी एक गोल करत बायर्न संघाला सोपा विजय मिळवून दिला. ही स्पर्धा मार्चमध्येच सुरू झाली होती. मात्र, करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा थांबविण्यात आली होती. अखेर प्रेक्षकांना प्रवेश नाकारत रिकाम्या मैदानावर हा सामना झाला. या सामन्याद्वारे जागतिक क्रीडा क्षेत्राला एक दिलासा मिळाला आहे.
या विजयासह बायर्न स्पर्धेत सर्वाधिक 58 गुणांची नोंद करत विजेतेपदाची दावेदारी सिद्ध केली आहे. युरोपात करोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा स्थितीत क्रीडा स्पर्धांसाठी प्रेक्षकांचा जीव धोक्यात घातला जाऊ नये यासाठी काही दिवसांपूर्वी या स्पर्धेला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, हा धोका कमी झाल्याने स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.