लेटर्स फ्रॉम इजिप्त : कर्नाक टेम्पल

श्‍वेता पटवर्धन

लक्‍सोर, इजिप्त

प्रिय जिज्ञासा, मागच्या पत्रात मी हतशेपसुत राणीच्या देवळाविषयी सविस्तर लिहिले होते. आज लक्‍सोर मधील अजून दोन महत्त्वाच्या देवळांविषयी तुला सांगणार आहे. एव्हाना तुला अंदाज आलाच असेल की इजिप्तमध्ये बरीच देवळे आहेत. त्याचे कारण असे की तिथले राजे स्वतःला देवासमान मानत. त्यामुळे आपण अजरामर व्हावे या हेतूने ते स्वतःचीच देवळे बांधत. परंतु आज मी ज्या देवळांविषयी सांगणार आहे ती कोणा एका फेरोची नाहीत.

त्या देवळांचे वैशिष्ट्य हे आहे की, कित्येक शतके त्यांचे बांधकाम होत राहिले. इजिप्तच्या प्रत्येक फेरोने त्यामध्ये काहीतरी भर घातली आणि ते देऊळ आकाराने आणि कीर्तीने वाढत गेले. त्यातील पहिले देऊळ म्हणजे टेम्पल ऑफ कर्नाक. शहराच्या थोडेसे बाहेरच्या बाजूला असलेले हे अमुन-रे, मुट आणि खोन्सा या देवांचे देऊळ जगातील भव्य वास्तुंपैकी एक आहे. ही जागा पवित्र असून इथे अमुन-रे देव पृथ्वीवरील लोकांना भेटतो अशी इथल्या लोकांची भाबडी समजूत होती. या देवळात पाद्रयांकरवी राजांना दैवत्व प्राप्त होई आणि मग इथे मोठा जल्लोष होत असे. सेनूस्रेत-ख हे देऊळ बांधणारा पहिला राजा असावा असा अंदाज आहे.

ओल्ड किंग्डममधील राजांनी याची सुरुवात जरी केली असली तरी 2000 हून अधिक वर्षे हे देऊळ सतत वाढत होते कारण मिडल किंग्डम, मग न्यू किंग्डम आणि त्यानंतर ग्रीक किंग्डम मधील राजांनी यामध्ये भर घातली. काहींनी मोठाले हॉल बांधले, काहींनी स्वतःचे पुतळे बसवले तर काहींनी भव्य खांब बसवले. बऱ्याच फेरोंनी त्यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून ओबेलीस्क बांधले. 200 एकर जमिनीवर पसरलेले हे भव्य देऊळ आजही धार्मिक कार्यासाठी बांधले गेलेले जगातील सर्वात मोठे बांधकाम आहे. सेटी-ख ने देवाला पुजायला बांधलेला हिपोस्टाईल हॉल (50,000 स्क़े. फु) धार्मिक कार्यासाठी बांधली गेलेली जगातील सर्वात मोठी खोली आहे. किमान 136 दणदणीत खांबांनी या खोलीचे छप्पर कित्येक शतके सहन केले. हे खांब आजच्या संगणकाच्या युगातही इजिप्तचे प्रतीक असलेल्या पापिरुयुसची झलक दाखवतात. सेटीच्या वंशजांनी त्या हॉलमध्ये चित्रे कोरून घेतली. ते खांब बघताना मान दुखल्याशिवाय राहत नाही इतके ते भव्य आहेत.

अशा कित्येक खोल्यांची पायपीट केल्यावर, इजिप्तच्या इतिहासातील कित्येक राजांचे समर्पण याची देही याची डोळा बघितल्यावर आपण देवळाच्या मागच्या बाजूला असलेल्या पवित्र सरोवरापाशी पोचतो. हा सरोवर तुथमोस-खखख या फेरोने खोदून घेतला. येथील पाणी पाद्री धार्मिक विधींसाठी वापरत. इथे एक बोटॅनिकल गार्डन आणि झू सुद्धा आहे. आता तुला वाटेल की इथे विविध प्रकारचे वनस्पती आणि वन्यजीव आहेत. पण असे काहीही नाही. तुथमोस-खखख ने विविध देशातून आणलेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या जातींचा संग्रह केला होता. त्याचे प्रतीक त्याने इथे भिंतीवर कोरून घेतले आहे.

कर्नाक टेम्पलची काळाच्या ओघात बरीच पडझड झाली. काही राजांनी ते पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला परंतु आज दुर्दैवाने आपण त्याकाळी ते कसे होते याची फक्त कल्पना करू शकतो. त्याची भव्यता मात्र आपल्याला स्तब्ध करते. त्या मोठमोठ्या खांबांसमोर, अतिश्रीमंत फेरोंसमोर आपण मुंगीहूनही छोटे आहोत याची जाणीव आपल्याला होते. त्याकाळी फेरोंनी आणि त्यांच्या मजुरांनी विस्मयकारक आणि भव्य वास्तू कशा बांधल्या याचे कोडे मात्र सुटण्याऐवेजी अजून गुंगागुंतीचे होत जाते. तुझी प्रवासी मावशी

Leave A Reply

Your email address will not be published.