राजनाथ सिंह यांची सियाचीन भेट
श्रीनगर: केंद्रीय संरक्षण मंत्रीपद स्वीकारल्यानंतर दोनच दिवसांनी राजनाथ सिंह यांनी आज जगातील सर्वात उंच लष्करी ठाणे असलेल्या सियाचीनला भेट दिली आणि तेथे तैनात असलेल्या भरतीय जवानांशी संवाद साधला. राजनाथ सिंह यांच्या समवेत लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत आणि उत्तर विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ रणबीर सिंह हे देखील होते. अत्यंत विपरीत हवामानामध्ये देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांच्या धैर्य आणि शौर्याबद्दल राजनाथ सिंह यांनी गौरवोद्गार काढले. आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी कोणतीही कसर न सोडणाऱ्या वीर जवानांचा आपल्याला अभिमान आहे. आपल्या मुलांना देशसेवेसाठी जाण्याची परवानगी दिली म्हणून या जवानांच्या पालकांना आपण स्वतः आभाराची पत्रे पाठवणार आहोत, असेही सिंह यांनी सांगितले.
सीयाचीनमध्ये आपले जवान अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये अत्यंत दृढपणाने आणि धैर्याने आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या या योगदानाल माझा सलाम आहे, असे राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर म्हटले आहे. सीयाचीन येथील युद्धस्मारकावर त्यांनी पुष्पांजली अर्पण केली.
काराकोरम पर्वतरांगांमधील सीयाचीन ग्लेसियर हे जगातील सर्वात उंच लष्करी ठाणे मानले जाते. तेथे भारतीय जवान वजा 60 अंश तापमानमध्ये देशाच्या संरक्षणासाठी सिद्ध असतात. सीयाचीन ग्लेसियरवर आतापर्यंत 1,100 जवानांना हौतत्म्य आले आहे. देश या वीर जवानांचा सेवा आणि त्यागाबद्दल नेहमीच ऋणी राहिल, असे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले.
राजनाथ सिंह यांनी सीयाचीनमधील युद्धसज्जतेचा आढावाही घेतला. त्यानंतर श्रीनगर येथे चिनार कॉर्पचे मुख्यालय असलेल्या बदामीबाग छावणी केंद्रामध्ये त्यांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या संभाव्य कुरापतींबाबत लष्करी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.
राजनाथ सिंह यांच्या आगोदर शरद पवार, जॉर्ज फर्नांडिस, मुलायम सिंह यादव आणि निर्मला सितारामन या माजी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनीही सीयाचीनला भेट दिली होती.
Here are some more pictures from today’s visit to Siachen. pic.twitter.com/vCEElpMUeb
— Rajnath Singh (मोदी का परिवार) (@rajnathsingh) June 3, 2019